अहमदनगर - राज्य सरकारच्या आदेशानंतर १६ नोव्हेंबरपासून राज्यातील धार्मिक स्थळे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर १६ नोव्हेंबरला पहाटेच्या काकड आरतीने शिर्डीच्या साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. १६ नोव्हेंबर पासून ते १८ नोव्हेंबर पर्यंत तब्बल २४ हजार ७०० भाविकांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.
शिर्डीत १६ ते १८ नोव्हेंबरदरम्यान २४ हजार भक्तांनी घेतले साईबाबांचे दर्शन भाविकांना मंदिरात सोडण्याआधी सर्वप्रथम त्यांचे सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग केले जाते. भाविकांसाठी पाय धुण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. तसेच, ज्या भक्तांना ताप असेल अशांना तातडीने उपचारासाठी साई संस्थांनच्या कोविड केअर हॉस्पिटलमध्ये तपासणी व उपचारासाठी दाखल करण्यात येते. साईबाबा समाधी मंदिरात दररोज ८ हजार साईभक्तांना दर्शनाचा लाभ दिला जात असून १० वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया व ६५ वर्षावरील व्यक्तींना, तसेच मास्क न वापरणाऱ्या साईभक्तांना मंदिरात प्रवेश दिला जात नसल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.
आरती करीता एकूण ६० साईभक्तांना प्रवेश
साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक ऑनलाइन पद्धतीने पास बुकिंग करत आहेत. तसेच, जे भाविक ऑनलाइन पास बुकिंग करू शकले नाहीत, अशांना मंदिरात आल्यानंतर ऑफलाइन दर्शन पासेस देऊन दर्शन करू दिले जात आहे. त्याचबरोबर, संस्थानच्या सर्व निवासस्थानांमध्ये पास काऊंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थानचे साई आश्रम १, साईबाबा भक्त निवासस्थान, व्दारावती भक्तनिवासस्थान व शिर्डी बसस्थानक येथील दर्शन पास काऊंटरवरून भाविकांना साई दर्शन पास दिले जात आहेत. तसेच, साईबाबांच्या मंदिरात होणाऱ्या आरतीसाठी प्रत्येक आरती करीता एकूण ६० साईभक्तांना प्रवेश दिले जात आहे.
१६ ते १८ नोव्हेंबरपर्यंत तब्बल २४ हजार ७०० भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले
सशुल्क दर्शन पास गेट नंबर १ समोरील जनसंपर्क कार्यालयातील पास वितरण कक्षातून दिला जात आहे. दर्शनासाठी भाविकांना गेट नंबर २ मधून प्रवेश दिला जात असून व्दारकामाई मंदिरातून समाधी मंदिरामध्ये दर्शन घेऊन गुरुस्थान मंदिर मार्गे ५ नंबर गेटव्दारे बाहेर पाठवले जात आहे. साई संस्थांनच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले जात आहे.
हेही वाचा -'ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या'