अहमदनगर - राहुरी तालुक्यातील अहमदनगर - मनमाड महामार्गावरील गुहा फाटा येथे कंटेनर आणि क्रुझर जीप व दोन दुचाकी अशा चार वाहनांचा (Ahmednagar Accident) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात शिर्डीवरुन शिंगणापूरला जात असलेल्या मध्यप्रदेशातील सेलूल येथील महिला (Women died from MP) साईभक्त जागीच ठार झालीय. तर सात-आठ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
एक महिला जागीच ठार
मध्यप्रदेश राज्यातील सेलूल येथील साईभक्त पुष्पा जयस्वाल जागीच ठार झाल्याची माहिती राहुरी पोलिसांनी दिली आहे. तसेच जीप चालक रमेश घोडके, जीपमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांची नावे समजली नाहीत. अपघाताची माहिती समजताच पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, प्रेरणा पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना चार रुग्णवाहिकेतून राहुरी व नगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातामुळे रस्त्यावर वाहनांची रांग लागली होती. रात्री साडेनऊ वाजता अपघातग्रस्त वाहने काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.