अहमदनगर - जामखेड तालुक्यातील झिकरी गावातील साईराम नामक हॉटेलमध्ये जमिनीखाली आरोपींनी एक मोठे लोखंडी पत्र्याचे कोठार केले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवा राज्यात तयार होणाऱ्या दारूचा साठा उत्पादन शुल्क विभाच्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. करमाळा रस्त्यावरील हा प्रकार घडला असून, महेश शिवाजी इकडे व ऋषिकेश अशोक काकडे यांना अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. मात्र, हे अवैध रॅकेट चालवणारा भाऊसाहेब पाटील गरड हा मुख्य सूत्रधार फरार आहे.
अहमदनगरमध्ये १० लाखांची दारू जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - जामखेड दारू तस्करी
जामखेड तालुक्यातील झिकरी गावातील साईराम नामक हॉटेलमध्ये जमिनीखाली आरोपींनी एक मोठे लोखंडी पत्र्याचे कोठार केले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवा राज्यात तयार होणाऱ्या दारूचा साठा उत्पादन शुल्क विभाच्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.
गोवा राज्यात तयार होणारी कमी किमतीची दारू अवैधपणे चोरून लपवून ठेवण्यात आली होती. ही दारू महाराष्ट्रात परवानगी असलेल्या विविध नामांकित विदेशी दारूच्या बाटलीत भरून विकण्याचा धंदा आरोपी करत होते. त्यासाठी लागणाऱ्या दारूच्या बाटल्या, विदेशी दारू कंपन्यांचे स्टिकर्स, झाकण, आदींचा मोठा साठा जमिनीखाली लपवून ठेवण्यात आला होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांच्या नेतृत्वाखाली संबंधित कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोव्यातील विदेशी मद्याचे ५७ बॉक्सेस, प्लास्टिकचे २८ हजार सिलकॅप, २ हजार पत्रा बुच तसेच ५ हजार लेबल, १० हजार रिकाम्या बाटल्या असा साठा जप्त केला आहे. मद्याची वाहतूक करण्यासाठी चारचाकी असा एकूण १० लाख ३ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी दिली.