अहमदनगर - औरंगाबाद येथून प्रसिद्ध होणाऱ्या एका वृत्त पत्राच्या संपादकावर समाजसेवक अण्णा हजारे चांगलेच नाराज झाले आहेत. जे वक्तव्य केलेलेच नाही, असे वक्तव्य आपल्या तोंडी मारून समाजात विशेषतः शिक्षक वर्गात गैरसमज आणि असंतोष निर्माण करण्याचा उद्योग या संपादकाने केला असून त्याबद्दल आपण त्या वृत्तपत्राला कायदेशीर कारवाईची नोटीस पाठवणार असल्याचे अण्णांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. तसेच यापूर्वीही या वृत्तपत्राने खोटे आणि बदनामीकारक वृत्त दिले होते. मात्र, त्यावेळी त्यांनी जाहीर माफी मागितल्याने आपण दुर्लक्ष केले. पण यावेळी आपल्याबाबत खोटे वृत्त प्रसिद्ध केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करणार असल्याचे अण्णांनी सांगितले आहे.
तक्रारीत अण्णांनी काय म्हटले? -
औरंगाबाद येथील एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले शिक्षकांसदर्भातील विधान मी केलेले नाही. ते माझ्या तोंडी घालून समाजात द्वेष भावना निर्माण करण्यासाठी अशी खोटी बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे वाटते. यापूर्वीही अनेकदा या वृत्तपत्रात माझ्याबद्दल आणि जनआंदोलनाबद्दल चुकीच्या व खोट्या बातम्या प्रसारीत करण्यात आल्या आहेत, असे निदर्शनास आले आहे.
समाजात शिक्षकाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. देशाचे भवितव्य असलेली नवीन पिढी घडविण्याचे काम शिक्षकच करीत असतात. त्यामुळे समाजात शिक्षकांविषयी आदराची भावना आहे. मीही शिक्षकांविषयी नेहमीच आदर व्यक्त केलेला आहे. परंतु काल या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे मला खेद वाटला. तसेच संपूर्ण शिक्षक वर्गात संभ्रम निर्माण झाल्याचे सोशल मिडियावर दिसून आले. ही बाब समाजाच्या दृष्टीने चांगली नाही. मी नेहमी सांगत असतो की, दिवसेंदिवस वाढती द्वेषभावना ही समाज व देशासाठी घातक आहे. काही अविचारी लोक समाजात दुही, द्वेषभावना आणि तेढ निर्माण होईल, असा प्रयत्न सातत्याने करीत असतात. त्यामुळे समाजाचे मोठे नुकसान होत असते.