शिर्डी- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद करण्यात आलेले शिर्डी विमानतळ गेल्या दोन आठवड्यापासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना या विमानसेवेने मोठा दिलासा मिळत आहे.
हैदराबाद ते शिर्डी विमानसेवा उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना ठरत आहे फायदेशीर - शिर्डी विमानतळ भक्तांसह नागरिकांनाही ठरले फायद्याचे
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 17 मार्चपासून साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले. त्यामुळे विमानतळही बंद करण्यात आले होते. मात्र बंद करण्यात आलेले शिर्डी विमानतळ गेल्या दोन आठवड्यापासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या शिर्डी विमानसेवेचा भाविकांबरोबर इतर नागरिकही लाभ घेत असल्याचे समोर आले आहे.
साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबर 2017 पासून शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु करण्यात आले. त्यानंतर दिवसभरात देशातील अनेक राज्यातील एकूण 25 ते 30 विमानांची शिर्डी विमानतळावर ये-जा सुरू होती. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 17 मार्चपासून साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले. त्यामुळे विमानतळही बंद करण्यात आले. साई मंदिर बंद झाल्याने विमानाने कोणीही शिर्डीला येणार नाही. मात्र भाविकांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या शिर्डी विमानसेवेचा भाविकांबरोबर इतर नागरिकही लाभ घेत असल्याचे समोर आले आहे.
कोरोना संसर्गामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने विमान सेवाही बंद करण्यात आली होती. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून हैदराबाद ते शिर्डी अशी ये-जा विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. सुरवातीला इंडीगो आणि नंतर स्पाईसजेटनेही ही सेवा सुरु केली आहे. शिर्डीला या विमानाने येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तर जाणाऱ्यांची संख्या कमी आहे. दररोज सुमारे २० किंवा ३० प्रवासी या विमानांनी शिर्डीला येतात. त्यात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रसह जिल्ह्यातील नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. सध्या लॉकडाऊनमुळे बाहेर अडकलेल्यांचे येण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. या विमानातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावर आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आरोग्य चाचणी करून त्यांचे नाव, पत्ता तसेच मोबाईल नंबर घेऊन त्यांना हॉम क्वारंटाईनचा शिक्का मारला जातो. व्यवसाय आणि कामानिमित्ताने लॉकडाऊनमुळे हैदराबाद तसेच इतर ठिकाणी अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना घर वापसीसाठी ही विमान सेवा दिलासादायक ठरत आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत दिल्ली ते शिर्डी ही विमान सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.