शिर्डी- लॉकडाऊनमुळे बंद असलेली विमानसेवा देशांतर्गत सुरू करण्याची केंद्र सरकारने घोषणा केली. त्यानंतर शिर्डी आंतराष्ट्रीय विमानतळावर सर्व प्राथमिक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. इंडिगोने शिर्डी-हैदराबाद ही विमानसेवा सुरू करण्याची तयारी देखील दाखवली. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, पोलीस आणि विमानतळ प्रशासनाची बैठक देखील पार पडली होती. आज हैदराबाद येथून विमान येण्याचे निश्चित झाले होते. मात्र राज्य सरकारने विमानसेवा सुरू करण्यास असमर्थता दाखवल्याने हे विमान रद्द करण्यात आले आहे.
हैदराबादवरुन शिर्डीला येणारे इंडिगो एअर लाईन्सचे विमान रद्द; 29 प्रवासी करणार होते प्रवास
संचारबंदीमुळे ठप्प झालेली विमानसेवा 25 मेपासून सुरु केली जाणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते. त्यामुळे शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हैदराबाद शिर्डी हे पहिले विमान येण्याचे निश्चीत झाले होते. मात्र सरकारने याबाबत असमर्थता दर्शवल्याने हे विमान रद्द करण्यात आले आहे.
देशांतर्गत विमानसेवा 25 मेपासून सुरू केली जाणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते. त्यामुळे शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हैदराबाद-शिर्डी हे पहिले विमान येण्याचे निश्चीत झाले होते. यासाठी हैदराबाद येथून येणाऱ्या 29 प्रवाशांनी बुकिंग केले होते. येणाऱ्या प्रवाशांची यादी देखील महसूल प्रशासनास प्राप्त झाली होती.
यात जळगाव, नाशिक, औरंगबाद, अहमदनगर अशा जिल्ह्यातील व्यक्तींचा समावेश होता. तर परतीच्या प्रवासात तीन व्यक्तींनी बुकिंग केले होते. विमानतळावर सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटाईझर अशा सर्व प्रयाप्त सुविधा करण्यात आल्या होत्या. केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर विमानतळ प्रशासनाने या उपाययोजना करत विमानतळ सज्ज केले होते. मात्र राज्य सरकारने कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे अडकलेले कर्मचारी यामुळे विमानसेवा सुरु करण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे आज सायंकाळी 6:30 येणारी हैदराबाद-शिर्डी फ्लाईट रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे.