अहमदनगर- जिल्ह्यातील जामखेड शहरामधील बीड रोडजवळ राहणाऱ्या शिल्पा अजय जाधव (वय 28 वर्षे) या विवाहितेने बुधवारी दुपारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना तिचा पती अजय कचरदास जाधव (वय 32 वर्षे) याला समजल्यानंतर त्यानेदेखील दुसऱ्या ठिकाणी काहीवेळातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या नवदाम्पत्याने एकाच दिवशी आत्महत्या केल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चार महिन्यांपूर्वीच झाला होता अजय-शिल्पाचा विवाह
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, अजय व शिल्पा या दोघांचा नुकताच चार महिन्यांपूर्वी मोठ्या थाटात विवाहसोहळा संपन्न झाला होता. बुधवारी (12 मे) दुपारी शिल्पा अजय जाधव (वय 28 वर्षे) हिने बीड रोड जवळील आदित्य गार्डन शेजारी असलेल्या राहत्या घरी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती तिचा पती अजय जाधव (वय 32 वर्षे) याला समजली. त्यानंतर त्याने देखील शहरातील मोरे वस्ती येथील त्याच्या पाण्याच्या जार प्लॉटमधील ऑफिसमध्ये काही वेळातच गळफास घेत आत्महत्या केली.