महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी - अहमदनगर

लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी नुसार केंद्र, दिनांक आणि वेळ संबंधितांना दिली जाते. असे असले तरी केवळ आधार कार्ड घेऊन नागरिक लसीची मागणी करत असल्याचे चित्र अहमदनगरमध्ये बघायला मिळाले.

अहमदनगरमध्ये लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी
अहमदनगरमध्ये लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी

By

Published : May 3, 2021, 9:12 AM IST

Updated : May 3, 2021, 9:27 AM IST

अहमदनगर : महापालिकेच्या आरोग्य विभागाने 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांसाठी सुरु केलेल्या लसीकरण मोहिमेचा रविवारी दुसरा दिवस होता. यावेळी नागरीकांनी लस घेण्यासाठी केंद्राबाहेर रांगा लावल्या, परंतु अनेकांनी ऑनलाइन नोंदणी केली नसल्याने केंद्रावर एकच गोंधळ उडाल्याचे चित्र बघायला मिळाले. लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी नुसार केंद्र, दिनांक आणि वेळ संबंधितांना दिली जाते. असे असले तरी केवळ आधार कार्ड घेऊन नागरिक लसीची मागणी करत असल्याचे चित्र अहमदनगरमध्ये बघायला मिळाले.

अहमदनगरमध्ये लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी
दुसऱ्या दिवशी केवळ एक हजार लसींचा पुरवठा
महापालिकेच्या माळीवाडा येथील लसीकरण केंद्रासह चार केंद्रांवर रविवारी नागरिकांनी लस घेण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. परंतु राज्य शासनाकडून महापालिकेला दुसऱ्या दिवशी केवळ 1000 लसींचे डोस प्राप्त झाले होते. हे डोस दुपारपर्यंत संपले. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला. माळीवाडा येथील केंद्रावर झालेल्या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांचा मोठा जमाव जमलेला दिसून येत आहे. सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळल्याने गर्दीतून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेकांनी गर्दी पाहून केंद्रावरून काढता पाय घेतला.
नोंदणी न करता नागरिक करताहेत गर्दी
शासनाने अठरा वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना नाव नोंदणी करण्यासाठी ॲप खुले केले आहे. त्यावर नोंदणी करणाऱ्यांना लस दिली जाणार आहे. परंतु अनेक जण नोंदणी न करता नोंदणी जागेवर करण्याची मागणी करताना दिसत आहेत. ही नोंदणी लसीकरण केंद्रावर होत नाही, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे नोंदणी करण्याची मागणी होऊ लागल्याने लसीकरण थांबविण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली. त्यामुळे नागरिकांनी नोंदणी करून दिलेल्या वेळेवर संबंधित केंद्रावर उपस्थित राहावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे.


गर्दी न करण्याचे आयुक्तांचे आवाहन
लसीकरण केंद्रांवर कमालीची गर्दी होत आहे. ही गर्दी नियंत्रणात आणणे कठीण झाले असून नागरिकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. नियमांचे पालन करून प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे असं आवाहन महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी केले आहे.

पोर्टलचा गोंधळ
राज्य शासनाच्या पोर्टलवर नोंदणी केलेल्यांना ग्रामीण भागातील केंद्र सुचवले जात आहे. एका तालुक्यातील व्यक्तीला दुसऱ्या तालुक्यातील केंद्रावर जावे लागत असून शहरातील नागरिकांना ग्रामीण भागातील केंद्र दिले गेले आहे. त्यामुळे नागरिकांचाही गोंधळ उडाला आहे. ज्या केंद्राचे नाव दिलेले आहे त्याच केंद्रावर लस घ्यावी लागणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आली आहे.

18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी केंद्र
- केडगाव नागरी आरोग्य केंद्र
- जिजामाता आरोग्य केंद्र
- महात्मा फुले आरोग्य केंद्र
- मुकुंद नगर नागरी आरोग्य केंद्र
- नागापुर आरोग्य केंद्र

45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्र
- तोफखाना आरोग्य केंद्र
- सिव्हिल आरोग्य केंद्र
- कै. गंगाधरशास्त्री आयुर्वेद महाविद्यालय

Last Updated : May 3, 2021, 9:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details