शिर्डी -कोरोनामुळे अनेक धार्मिक सण साध्या पद्धतीने साजरे होत आहेत. साईबाबांचा १०२वा पुण्यतिथी उत्सव कशा स्वरूपात साजरा होणार आहे, याकडे सर्व भक्तांचे लक्ष लागले होते. यावर्षी हा उत्सव प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. शनिवार (२४ ऑक्टोबर) ते सोमवार (२६ ऑक्टोबर) या कालावधीत हा उत्सव साजरा होईल. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी ही माहिती दिली.
जाणून घ्या... असा साजरा होईल यावर्षीचा साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिकात्मक भिक्षा झोळीकरिता साईभक्तांकडून भिक्षा स्वीकारण्यासाठी मंदिर परिसरात व्यवस्था असेल, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिकात्मक भिक्षा झोळीकरिता साईभक्तांकडून भिक्षा स्वीकारण्यासाठी मंदिर परिसरात व्यवस्था असेल, असे कान्हुराज बगाटे म्हणाले.
मुख्य दिवशी भिक्षाझोळीचा कार्यक्रम
साई पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी परंपरेनुसार भिक्षाझोळीचा कार्यक्रम होत असतो. त्या अनुषंगाने भिक्षा झोळीकरिता गावकरी व साईभक्तांकडून भिक्षा स्वीकारण्यासाठी मंदिर परिसरातील गेट नंबर ०४, पिंपळवाडी रोड गेट नंबर ०२, चावडी समोर, नाट्यगृहा शेजारी तसेच साईनगर मैदान येथे काऊंटर्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी गावकरी व साईभक्तांनी भिक्षाझोळीत दान, भिक्षा देताना मास्कचा वापर करावा व सामाजिक अंतरासंदर्भातील नियमांचे पालन करावे. तसेच संस्थानच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
मंदिरातील कार्यक्रमाची रूपरेषा
साई पुण्यतिथी उत्सवानिमित्त प्रथम दिवशी शनिवार (२४ ऑक्टोबर) पहाटे ०४.३० वाजता साईंची काकड आरती, पहाटे ०५.०० वाजता फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ०५.१५ वाजता व्दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, पहाटे ०५.४० वाजता साईंचे मंगलस्नान, सकाळी ०६.०० वाजता तसेच पाद्यपूजा, दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती, दुपारी ०४.०० ते ०६.०० यावेळेत कीर्तन, सायंकाळी ०६.०० वाजता धुपारती होईल. रात्री १०.३० वाजता श्रींची शेजारती होणार आहे. त्यानंतर समाधी मंदिर बंद केले जाईल. परंतु श्री साईसच्चरित अखंड पारायण श्री द्वारकामाई मंदिरात रात्रभर चालू राहील.
उत्सवाच्या मुख्य दिवशीचे कार्यक्रम
रविवार (२५ ऑक्टोबर) हा श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस आहे. या दिवशी पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ०५.०० वाजता अखंड पारायण समाप्ती, श्रींच्या फोटो व पोथीची मिरवणूक, पहाटे ०५.२० वाजता श्रींचे मंगल स्नान, सकाळी ०६.०० वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी ०८.३० ते ०९.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १०.०० वाजता कीर्तनाचा कार्यक्रम तसेच सकाळी १०.३० वाजता श्रींच्या समाधीसमोर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती तर सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सीमोल्लंघन कार्यक्रम, सायंकाळी ०६.०० वाजता धुपारती होईल. तर रात्री १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल.
उत्सवाची सांगता...
उत्सवाच्या सांगता सोमवारी (२६ ऑक्टोबर) होईल. या दिवशी पहाटे ०४.३० वाजता काकड आरती, सकाळी ०५.२० वाजता श्रींचे मंगल स्नान, सकाळी ०६.०० वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी ०६.३० वाजता गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होईल. सकाळी १०.०० वाजता गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार असून दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती, सायंकाळी ०६.०० वाजता श्रींची धुपारती होऊन रात्री १०.३० वाजता शेजारती होणार आहे.