अहमदनगर - गृहरक्षक दलाच्या जवानांना मागील सहा महिन्यांपासून पगार मिळाला नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच कामावर आले नाहीतर नोटीस दिल्या जातात, असा आरोप गृहरक्षक दलाच्या संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर २४ फेब्रुवारीला आझाद मैदानावर राज्यभरातील गृहरक्षक दलाचे जवान आंदोलन करणार असल्याची माहिती भारत चव्हाण यांनी दिली आहे.
गृहरक्षक दलाच्या जवानांना सणाच्या दिवशी कामावर घेतले जाते. यामुळे त्यांना उपजीविकेसाठी अर्धवेळ इतर ठिकाणी कामावर जावे लागते. जर कामावर गेले नाही तर काढून टाकण्याची धमकी दिली जाते. तसेच मिळणारे वेतन तुटपुंजे आहे. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या या जवानांना कामाचा मोबदला मात्र, सहा-सहा महिने मिळत नाही. म्हणून याप्रश्नी शासनाने लक्ष देऊन त्वरित वेतन अदा करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नाहीतर उपोषण, आंदोलन आणि प्रसंगी आत्मदहन करू, असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.