महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शेतीला उद्योगाप्रमाणे पॅकेज देण्याची गरज, अन्यथा शेतकरी दहा वर्षे उभा राहू शकणार नाही' - आदर्शग्राम हिवरेबाजार बातमी

सरकार उद्योगांना ज्या प्रमाणे पॅकेज देते तसेच पॅकेज शेतीला द्यावे लागणार आहे, तसेच तोंडावर असलेल्या खरिपासाठी शेतीची असलेली नांगरणी, पेरणी, कोळपणी, खुरपणी ही कामे मनरेगा अंतर्गत घेत शेतकऱ्यांना रोजगाराच्या माध्यमातून आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याचे मत आदर्शग्राम हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

शेतीला उद्योगाप्रमाणे पॅकेज देण्याची गरज
शेतीला उद्योगाप्रमाणे पॅकेज देण्याची गरज

By

Published : Apr 15, 2020, 9:31 AM IST

अहमदनगर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शहरी भागात असला तरी त्याचे आर्थिक दुष्परिणाम ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेती व्यवसायावर पडले आहेत. त्यामुळे, शेती व्यवसाय पुढील १० वर्षे उभा राहणार नाही, अशी भीती आदर्शग्राम हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केली आहे. तुटून पडत असलेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभे करायचे असेल तर, शेतीला उद्योगाप्रमाणे विशेष पॅकेज देण्याची गरज असल्याचे मत पोपटराव पवार यांनी व्यक्त केले आहे.

शहरी भागातील जनता शिस्त पाळत नसल्याने त्याचे परिणाम शेती व्यवसायावर पडत आहेत. वाशी (नवी मुंबई), गुलटेकडी(पुणे) आदी भाजी-फळे मार्केट सुरू होती, पण लोकं शिस्त पाळत नसल्याने ती बंद करण्याची वेळ आल्याचे पवार यांनी सांगत हिवरेबाजाराचे उदाहरण दिले. हिवरेबाजारमध्ये सामाजिक अंतर पाळत अनेक गावातील शेतमाल, फळ-फळावट खरेदी-विक्रीच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसत असताना आता दुष्काळात दिले जाते तसे अनुदान देण्याची गरज पवार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली. सरकार उद्योगांना ज्या प्रमाणे पॅकेज देते तसेच पॅकेज शेतीला द्यावे लागणार आहे, तसेच तोंडावर असलेल्या खरीपासाठी शेतीची असलेली नांगरणी, पेरणी, कोळपणी, खुरपणी ही कामे मनरेगा अंतर्गत घेत शेतकऱ्यांना रोजगाराच्या माध्यमातून आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.

कोरोनाने निसर्गाचे संतुलन केले -

कोरोना विषाणूने हाहाकार उडवला असला तरी कुठेतरी निसर्गाचे संतुलन साधण्याची किमया यानिमित्ताने झाली असल्याचेही पवार म्हणाले. प्राणी मात्रावर आक्रमण करणारा मानव आज जीवाच्या भीतीने घरात आहे. तर, प्राणी-पक्षीजग आज सर्वत्र मुक्तसंचार करत आहे, निसर्गाने यानिमित्ताने मनुष्याला जागे करण्याचे काम केले आहे. आज प्रदूषण थांबल्याने नैसर्गिक घटक मुबलक प्रमाणात निर्माण झाले आहेत. त्यामुळे कोरोनाने एक धडा शिकवला याची जाणीव पुढील काळात मानवाला ठेवून प्राणीमात्राशी जुळवून घ्यावे लागेल, असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details