अहमदनगर Herambh Kulkarni :सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सोमवारी (९ ऑक्टोबर) अटक केली. हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी अहमदनगर शहरात काही अज्ञात इसमांनी हल्ला केला होता. घटनेच्या सीसीटीव्ही व्हिडीओ द्वारे कारवाई करत पोलिसांनी आरोपींना अटक केली.
काय आहे प्रकरण : हेरंब कुलकर्णी ज्या महाविद्यालयात मुख्याध्यापक आहेत, त्या महाविद्यालच्या शेजारी अक्षय सब्बन या आरोपीची पान टपरी होती. या पान टपरीबाबत त्यांनी महानगरपालिकेकडे अर्ज केला होता. त्यानंतर पालिकेनं कारवाई केली. या कारवाईचा राग मनात धरून अक्षय सब्बन यानं हेरंब कुलकर्णी यांच्यावर त्याच्या पाच साथीदारांसह हल्ला केला.
दोन आरोपी फरार : या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवारी कलम ३२४, ३४१ आणि ३२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र कुलकर्णी यांना लोखंडी रॉडनं मारहाण झाली असल्यानं पोलिसांनी दाखल गुन्ह्यामध्ये कलम ३०७ जोडला. पोलिसांनी अहमदनगर शहरातील कोंड्यामामा चौकात आरोपीला अटक केली. आरोपींमध्ये अक्षय सब्बन, चैतन्य सूडके आणि एका विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे. या प्रकरणातील इतर दोन आरोपी फरार आहेत.
फेसबुक पोस्टनंतर दखल घेतली : हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी (७ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला होता. कुलकर्णी यांना अहमदनगर शहरातील रासने नगरमध्ये तीन तरुणांनी लोखंडी रॉडनं मारहाण केली होती. या घटनेनंतर, हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नीनं सोशल मीडियावर पोस्ट टाकून घटनेला वाचा फोडली. हा प्रकार गंभीर असून शासनाने याकडे लक्ष द्याव, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या फेसबुक पोस्टनंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत तीन आरोपींनी अटक केली आहे.
हेही वाचा :
- Assault On Herambh Kulkarni : विचारवंत हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला; मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल