अहमदनगर -जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पावसाने जोर वाढवला असून पारनेर तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. पारनेरच्या उत्तर भागातील अनेक गावात रात्री सुरू झालेल्या पावसाने पहाटेपर्यंत झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पारनेरच्या वनकुटे, ढवळपुरी परिसरात रात्री बारा वाजल्यापासून पावसाने चांगलाच तडाखा दिल्याने परिसरातील काळू नदीसह ओढे-नाल्यांना पूर परस्थिती आहे. काळू नदी पात्रात प्रचंड पाण्याच्या प्रवाहात वनकुटे-ढवळपुरी दरम्यान असलेला पूल वाहून गेला असल्याची तसेच वनकुटे-पळशी रस्त्यावर पळशी नजीक असलेला ओढयावरील पूल तुटला असल्याची माहिती वनकुटेचे सरपंच राहुल झावरे यांनी दिली आहे.
या परिसरातील नदी-ओढ्यावरील पूल बाधित झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे. परिसरातील अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाल्याचे वृत्त आहे. तसेच शेतातील
सोयाबीन, बाजरी, मूग, वांगी, टोमॅटो या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सरपंच झावरे यांनी सांगितले आहे. अतिवृष्टी आणि पिकांचे झालेल्या नुकसानीबाबत त्यांनी मतदारसंघाचे निलेश लंके यांना कल्पना दिल्यानंतर आमदार लंके यांनी प्रशासनाला तातडीने मदतकार्याबद्दल सूचना दिल्या आहेत.