अहमदनगर - जिल्ह्यातील उत्तरनगर भागात अनेक ठिकाणी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक दिवसांपासून उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर, काही घरांचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाची चाहूल लागली असून येत्या काही दिवसात पेरणीसाठी शेत मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागात पावसाची जोरदार हजेरी - Ahmednagar district
अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागात जोरदार पावसाने हजेरी लावली..सायंकाळी पासून साईबाबांच्या शिर्डीसह राहाता तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला..
संगमनेर तालुक्यातील पठारभागासह बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. विजेच्या कडकडाटासह मुसळधार वाऱ्याने या भागात अनेक मोठमोठी झाडे तसेच विजेचे खांब उन्मळून शेतामध्ये पडले. भोजदारी येथील गोरख सदु मते यांच्या गोठ्यातील बैलाच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला. अकोले शहरासह ग्रामीण भागात रविवारी संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह वरुण राजाने हजेरी लावली. सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. अखेर सायंकाळी पाऊस झाला. पाऊस अतिशय अल्पसा झाला असला तरी गेली अनेक महिने दुष्काळाची झळ सोसणाऱ्या शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली. संगमनेर अकोले रस्त्यावरील सुगाव फाट्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता.