महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार - भंडारदरा पाणलोट क्षेत्र

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. धरणात सध्या पाण्याची जोरदार आवक सुरू झाली आहे.

भंडारदरा धरण
भंडारदरा धरण

By

Published : Aug 13, 2020, 9:25 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - उत्तर भागात जिल्ह्याला वरदान ठरलेल्या अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. धरणात सध्या पाण्याची जोरदार आवक सुरू झाली आहे. काही दिवसांच्या उघडीपीनंतर पुन्हा पाऊस पडत आहे.

पाणलोट क्षेत्रासह कळसुबाई शिखराच्या पर्वतरांगांना अक्षरशः झोडपून काढले आहे. भंडारदरा धरणात 519 दलघफु नवीन पाण्याची आवक झाली असल्याने भंडारदरा धरण 75 टक्के तर निळवंडे धरणाचा साठा 60 टक्के झाला आहे.

भंडारदरा धरणात होणाऱ्या नवीन पाण्याची आवक विचारात घेता पाणलोट व कळसुबाई शिखराच्या पर्वतरांगामध्ये पावसाचा जोर वाढल्याने 15 ऑगस्टपर्यंत धरण भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात पाणलोटात घाटघर येथे 165 मीमी तर रतनवाडी येथे 155 मीमी, पांजरे येथे 145 मीमी तर भंडारदरा येथे 140 मीमी पावसाची नोंद झाली.

भंडारदरा धरणात मागील चोवीस तासात 519 दलघफु नवीन पाण्याची आवक झाली. यामुळे धरणात 8 हजार 266 दलघफुपर्यंत पाणीसाठा पोहचला होता. दरम्यान, कळसुबाई शिखराच्या पर्वतरांगातही पावसाचा जोर वाढल्याने त्यातचं निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाकी येथे 90 मीमी पावसाची नोंद झाली. वाकी येथील लघुपाटबंधारे तलावावरून सकाळी 6 वाजता 1 हजार 22 क्युसेक्सने पाणी प्रवरेची उपनदी असलेल्या कृष्णावंती नदीपात्रात झेपावत असल्याने निळवंडे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. निळवंडे धरणातील पाणीसाठा गुरुवारी सकाळी 6 वाजता 5 हजार 14 दलघफु म्हणजेच 60 टक्के इतका झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details