अहमदनगर- भंडारदरा धरणाचे पाणलोट क्षेत्र तसेच कळसूबाई हरिश्चंद्रगड परिसरात एक जुलैपासून चांगला पाऊस पडत असल्याने शेतकरी सुखावला आहे. जोरदार पावसाने धरणसाठ्यातही वाढ होत आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांनी भातपिकाची लावणी सुरू केली आहे, तर दुसरीकडे पर्यटकांच्या गर्दीने परिसर गजबजून गेला आहे.
आदिवासी पट्ट्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाने भातखाचरे तुडुंब भरली आहेत. यात भातलावणी इतके पाणी साठले आहे. त्यामुळे भात लावणीला वेग आला आहे. डोक्यावर ईरळे, घोंगडी व प्लास्टिक कागद घेऊन शेतकरी भाताची लागवड करीत आहे. पावसाच्या आगमनाने आदिवासी शेतकरी मुलाबाळांसह शेतीच्या कामात गुंतले आहेत. साम्रद, उडदावणे, शिंगणवाडी, लव्हाळवाडी, कोरठवाडी, घाटघर येथील भात लावणीची कामे सुरू झाली आहेत. नातेवाईकांना एकजूट करून शेतकरी शेतीची कामे करू लागले आहेत. या क्षेत्रात मुख्य पीक भात असल्याने शेतकरी भाताच्या हळे, गावे, इंद्रायणी, काक, भात, २४८, जिरवेल, आंबेमोहर, रूपाली, पूनम, गोवर्धन, कोळपी आदी भातपिके लावून जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, यंदा योग्य वेळी पाऊस न पडल्याने देवावर हवाला ठेवून गरीब आदिवासी शेतकरी भातपिकांचे नियोजन करीत आहेत.
पावसामुळे धरणांमध्ये सुद्धा पाणी भरले आहे. भंडारदरा धरणात मंगळवारी सायंकाळी सहा वाजता पाणी पातळी दोन हजार ४७६ दशलक्ष घनफूट होती. दरम्यान, शनिवारी सकाळी सहा ते सोमवारी सायंकाळी सहा या ४८ तासांच्या कालावधीमध्ये पडलेल्या पावसात भंडारदरा धरणात तब्बल १ हजार ३८४ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. पावसाने चांगले आगमन केल्याने फुलून गेलेल्या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले परिसरात वळू लागली आहेत.
रविवारी सर्वाधिक पाऊस पांजरे येथे झाला तर घाटघर येथे मोठ्या प्रमाणात धुके व पाऊस सुरू होता. भंडारदरा धरण परिसरात शनिवारी आणि रविवारी धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. रिमिक्सच्या गाण्यांवर ताल, ठेका धरत, धबधब्याखाली बसून, पावसाचे तुषार झेलत, नाचत, बागडत पर्यटक आनंद लुटत होते. धरण परिसरात लोकांची गर्दी पाहता यापुढे सुट्यांच्या काळात पर्यटकांची अधिक गर्दी होणार असल्याची शक्यता आहे.