अहमदनगर :शिर्डीतील एका तरुणीचे आणि नजीकच्या साकुरी येथील तरुणाशी प्रेमसबंध होते. मात्र, मुलीने लग्नास नकार दिल्याने तरुणाने गुरुवारी रागाच्या भरात मुलीच्या घरी जाऊन स्वत:ला जाळून घेतले आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तो गंभीररित्या भाजला तर, तरुणीही जखमी झाली. तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज (शुक्रवारी) उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सार्थक बनसोडे (वय २२) असे या तरुणाचे नाव आहे.
शिर्डीजवळील साकुरी येथील सार्थक हा श्रीरामपूर तालुक्यातील एका महाविद्यालयात बीएससी नर्सिंगच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याचे शिर्डीतील एका तरुणीशी प्रेमसबंध होते. मात्र, नंतर तरुणीने लग्नाला नकार दिल्यामुळे सार्थकने रागाच्या भरात गुरुवारी शिर्डीतील मुलीच्या घरी जाऊन अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकत स्वतःला पेटवून घेतले. तो इतक्यावरच थांबला नाही तर, त्यान त्या तरुणीला मिठी मारली. मात्र, ऐनवेळी मुलीचे वडील मधे आले आणि त्यांनी तिची सुटका केली. यात ती ३५ टक्के भाजली तर, तिचे वडीलही जखमी झाले. मात्र, सार्थक यात गंभीररित्या भाजला. त्याला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.