अहमदनगर - जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा प्रयत्न करत आहे. कोरोनाची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आता बाधित रुग्णांना गृह विलगीकरणाऐवजी कोविड केअर सेंटरमध्येच दाखल केले जाणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्हा प्रशासन त्यासंदर्भातील आदेश जारी करतील, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक -
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मुश्रीफ यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडदे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी अशोक राठोड आदी यावेळी उपस्थित होते.
संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नियम पाळा -
सध्या जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत नगर शहरात अनेक नागरिक विनामास्क फिरताना दिसत आहेत. संसर्ग वाढवण्यास कारणीभूत ठरणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. महानगरपालिका क्षेत्रात तसेच काही तालुक्यांच्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढीचा वेग जास्त आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी केली जावी, असे निर्देश मुश्रीफ यांनी दिले. गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक जागांवर नागरिक विनामास्क दिसणार नाहीत, यासाठी प्रत्येकाने आग्रही राहिले पाहिजे. नागरिकांनीही स्वत:च्या आणि इतरांच्या आरोग्याचा विचार केला पाहिजे, असे मुश्रीफ यांनी नमूद केले.