अहमदनगर -जंगली श्वापदांचा संचार मानवी वस्तीकडे वाढल्याने हल्ल्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. संगमनेर तालुक्यात शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास अशीच एक घटना समोर आली आहे. तालुक्यातील पठार भागातील रणखांब गावांतर्गत असलेल्या लांडगदरा येथे लांडग्याने धुमाकूळ घातला. त्याने एका आजीसह नातीलाही गंभीर जखमी केले. तर, चार जनावरांवर हल्ला देखील केला, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
रणखांबच्या लांडगदरा येथील गोरख रंगनाथ गुळवे हे शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहतात. शुक्रवारी दुपारी त्यांची पत्नी चंद्रकला व नात ऋतुजा या दोघी घरासमोरील अंगणात काम करत होत्या. त्याचवेळी अचानक लांडग्याने हल्ला चढवत आजी चंद्रकला यांच्या डाव्या हाताचे बोट तोडत हाताच्या पंज्याचाही जोराचा चावा घेतला. त्यानंतर जवळच असलेल्या ऋतुजावरही जोरदार हल्ला चढवत तिची मान, चेहरा व हाताला गंभीर दुखापत केली. त्यामुळे दोघेही रक्तबंबाळ झाल्या होत्या. आजी चंद्रकला यांनी जोरजोराने आरडाओरड केल्याने आजूबाजूला असलेल्या काही नागरिकांनी त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेत लांडग्याला पिटाळून लावले. त्यानंतर लांडग्याने परिसरातील शेतकरी अर्जुन मच्छिंद्र गुळवे यांच्या दोन गायी, वासरू आणि शेळीवर हल्ला करत त्यांनाही गंभीर दुखापती केल्या.