अहमदनगर -टोमॅटोप्रश्नी शेतकऱ्यांना अचूक व समाधानकारक निदान उपलब्ध करावे. तसेच पीक नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. रोग निदानाबाबत प्राप्त झालेल्या रिपोर्टबाबतही निवेदनात शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. टॉमेटो, भाज्या व फळभाज्या या सारख्या सर्व नाशवंत पिकांना नैसर्गिक आपत्ती, रोगराई व दराबाबतचे चढ-उतार यापासून संरक्षण मिळावे यासाठी विमा योजना सुरू करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.
शेतकऱ्यांनी IIHR बंगळुरू या संस्थेला पाठविलेल्या नमुन्यांचे निष्कर्ष शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत. यानुसार टोमॅटोवर कुकूंबर मोझॅक व्हायरस (सी.एम.व्ही.), टोबॅको व्हेन डिस्टॉर्शन व्हायरस (टी.बी.व्ही.डी.व्ही), ग्राऊंडनट बड नेक्रॉसिस व्हायरस व टोमॅटो मोझॅक व्हायरस हे ४ मुख्य विषाणुंचा संसर्ग झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. फळ परिपक्व होण्याच्या काळात तापमान वाढल्यामुळे, खतांचा व पोषकांचा अतिवापर झाल्याने टॉमेटो पिकाचे नुकसान झाल्याचे सूचित करण्यात आले आहे. मात्र, याबाबत शेतकरी सहमत नाहीत.
दरम्यान, वरील विषाणुंचा संसर्ग टोमॅटो पिकात यापूर्वीही आढळलेला आहे. मात्र, एकाचवेळी हा संसर्ग साथीसारखा चार जिल्ह्यात पसरल्याची बाब वेगळी आहे. संसर्गाचे साथ सदृश परिस्थितीत रुपांतर कशामुळे झाले हे या पार्श्वभूमीवर शोधणे आवश्यक आहे. प्राप्त रिपोर्टवरून या संसर्ग विस्ताराचे समाधानकारक उत्तर मिळत नाही.