शिर्डी : Golden Boy Avinash Sable :आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक पटकवणाऱ्या बीडच्या अविनाश साबळेनं भारतात परतताच शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. यावेळी साबळेनं आपल्याकडील सुवर्णपदक साईबाबांच्या समाधीवर ठेवत मनोभावे साईबाबांचं दर्शन घेतलंय.
सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू : चीन येथील हांगझोऊ इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये बीडच्या अविनाश साबळेनं तब्बल 3 हजार मीटर स्टीपलचेसमध्ये 8:19.50 सेकंदात शर्यत पूर्ण करुन राष्ट्रीय विक्रम केलाय. अविनाश साबळेनं यापुर्वी सन 2018 च्या जकार्ता गेम्समध्ये इराणच्या होसेन केहानीनं बनवलेला 8 मिनिटांचा आणि 22.79 सेकंदांचा आशियाई क्रीडा स्पर्धेतील विक्रमही मोडलाय. अविनाश ऍथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला असून त्यानं 5 हजार मीटर शर्यतीत रौप्य पदकही मिळविलंय. अविनाश साबळे हा महाराष्ट्रातील बीड येथील रहिवाशी असुन वयाच्या सहाव्या वर्षापासून तो धावण्याचा सराव करत होता. 12 वी चं शिक्षण पूर्ण केल्यानंतर अविनाश भारतीय लष्कराच्या 5 महार रेजिमेंटमध्ये दाखल झालाय.
मंदिराच्या वतीनं अविनाशचा सत्कार : दरम्यान, अविनाश साबळेनं 7 ऑक्टोबर रोजी आपल्या वडिलांनासह सायंकाळी शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी आपल्याकडील सुवर्णपदक त्यानं साईबाबांच्या समाधीवर ठेवत साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतलं. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी अविनाशचा यावेळी साई शॉल आणि साईंची मूर्ती देवुन सन्मान केलाय.
शेती कामासाठी करतो वडिलांना मदत : मराठमोळा अविनाश हा शेतकरी कुटुंबातील आहे. त्यामुळं तो नेहमी आपल्या वडिलांना शेती कामात मदत करतो. कोरोना काळात त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आपण पुन्हा धावू शकतो की नाही, या मानसिक चक्रात तो अडकला होता. मात्र आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर अविनाश पुन्हा कोरोना आजारातून बाहेर आला आणि त्यानं पुन्हा धावायला सुरुवात केली. त्यानंतर मेहनतीच्या जोरावर अविनाशनं राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला अनेक पदकं जिंकून दिली आहेत.
हेही वाचा :
- Asian Games 2023 : मराठमोळ्या अविनाशची 'गोल्डन' कामगिरी; 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्ण पदक
- Government Treasury : क्रीडापटूंच्या तयारीसाठी सरकारने उघडली तिजोरी; खेळाडूंसाठी उभारले देश-विदेशात प्रशिक्षण कॅम्प
- 18th World Athletics Championships : स्टीपलचेस स्पर्धेत भारताच्या पदरी निराशा; अविनाश साबळेचे पदक हुकले