महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेचे घनश्याम शेलार पुन्हा राष्ट्रवादीत...पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश - shivsena

अहमदनगर शिवसेनेचे जिल्हा समन्वयक घनश्याम शेलारांची घरवापसी.... शरद पवरांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादीत प्रवेश... लोकसभेच्या दृष्टीने शेलारांचा प्रवेश राष्ट्रवादीसाठी ठरणार जमेची बाजू

शिवसेनेचे घनश्याम शेलार पुन्हा राष्ट्रवादीत.

By

Published : Mar 17, 2019, 11:45 AM IST

अहमदनगर- शिवसेनेचे जिल्हा समन्वयक आणि श्रीगोंदा तालुक्यातील नेते घनश्याम (अण्णा) शेलार यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शेलार गेले ३ वर्षे शिवसेनेत होते, पण युतीचा निर्णय झाल्याने शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले शेलार नाराज झाले आणि त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता. अपेक्षप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

शिवसेनेत येण्यापूर्वी शेलार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच जिल्हाध्यक्षपदावर कार्यरत होते. शरद पवारांशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. शेलार यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात ही भारतीय जनता पक्षापासून झाली. एक उत्तम संघटक, समन्वयक म्हणून त्यांची ओळख आहे. पक्ष संघटनेत वरिष्ठ नेत्यांशी उत्तम सबंध ठेवण्याची त्यांच्याकडे हातोटी असली तरी त्यांना या ना त्या कारणाने एक तर संधी मिळाली नाही, किंवा मिळाली तर अपयश आले. त्यामुळे सातत्याने त्यांनी पक्ष बदल केला असला तरी आहे त्या पक्षात ते आपले अस्तित्व ठेवून राहिले आहेत. आता पुन्हा त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश ही पक्षासाठी जमेची बाजू असणार आहे.

2014 ला श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांच्यासाठी बबनराव पाचपुते यांच्या विरोधात सर्वपक्षीयांची आणि नेत्यांची त्यांनी उत्तम मोट बांधून जगताप यांच्या विजयात मोलाची कामगीरी बजावली होती. त्यातच नगर दक्षिणेची लोकसभा सध्या सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशामुळे मोठीच चर्चेत आणि प्रतिष्ठेची झालेली असताना शेलार यांचा राष्ट्रवादी प्रवेश संघटन-नियोजन म्हणून फायद्याच्याच असणार आहे.


शनिवारी शरद पवार यांच्यासह, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप नाईक, आमदार राहुल जगताप यांच्या उपस्थितीत कोपरखैरणे नवी मुंबई येथील कार्यक्रमात घनश्याम शेलार यांचा पदाधिकारी व सहका-यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सोहळा पार पडला.

ABOUT THE AUTHOR

...view details