परभणी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सूतगिरणीचे चेअरमन, माजी नगराध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय संघटक महासचिव अॅड. गौतम भालेराव यांचे बुधवारी (२७ मार्च) रात्री हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. गंगाखेड येथील त्यांच्या राहत्या घरी "सम्राट निवास" याठिकाणी ही दुःखद घटना घडली.
रिपाइंचे राष्ट्रीय संघटन महासचिव अॅड. गौतम भालेराव यांचे निधन - गौतम भालेराव
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय संघटक महासचिव अॅड. गौतम भालेराव यांचे बुधवारी (२७ मार्च) रात्री हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले
![रिपाइंचे राष्ट्रीय संघटन महासचिव अॅड. गौतम भालेराव यांचे निधन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2823941-393-1d606415-5d0d-4f93-9d01-5450afe68da4.jpg)
सर्वत्र दादा नावाने ओळखले जाणारे भालेराव अत्यंत बिनधास्त प्रवृत्तीचे होते. त्यांनी गंगाखेड शहराचे नगराध्यक्ष पद यशस्वीपणे सांभाळले. त्यानंतर ते रिपाइंच्या आठवले गटात राष्ट्रीय संघटन महासचिव म्हणून सक्रिय झाले. गेल्या ७ ते ८ वर्षांपासून ते पालम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सूत गिरणीचे चेअरमन म्हणून काम करत होते. आंबेडकर चळवळीतील एक सच्चा कार्यकर्ता म्हणूनही ते ओळखले जातात. त्यांच्या पश्चात चार भाऊ, पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई, सहा बहिणी, नात असा परिवार आहे. त्यांच्या जाण्यामुळे दलित चळवळीत पोकळी निर्माण झाली आहे. या दुःखद घटनेमुळे गंगाखेड शहर व परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (गुरुवारी) दुपारी ४ वाजता जी. भालेराव डी.एड. कॉलेज, दत्त मंदिर जवळ, राणीसावरगांव रोड, गंगाखेड येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.