अहमदनगर - काही दिवसांपासून सुलेखन स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या श्रेया सजन या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तिच्या सुलेखनाचे नेटीझन्स आणि मंत्र्यांनीही कौतुक केले. श्रेयाच्या यशाबद्दल तिचे कौतुक करायलाच हवे, मात्र याच स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवलेला विद्यार्थी दुर्लक्षित राहिला. गणराज म्हसे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. गणराज राहाता तालुक्यातील वाकडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिकतो. जिल्हा स्तरावर झालेल्या सुलेखन स्पर्धेत त्याने पहिला क्रमांक मिळवला आहे.
गणराजच्या वडिलांना पक्षाघात झाल्याने ते कुटुंबाच्या निर्वाहाची जबाबदारी पार पाडू शकत नाहीत. त्यामुळे मुलांचे शिक्षण, घरखर्च, पतीचा दवाखाना याचा आर्थिक भार त्याची आई वनिता यांच्यावर आहे. त्यामुळे वनिता या श्रीरामपूर एमआयडीसीमधील एका फर्निचर मॉलमध्ये काम करतात.