महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पेमरेवाडी मुलभूत सुविधांपासून वंचित; विकासासाठी भाजपवासी झालेले वैभव पिचड आता तरी लक्ष देतील का?

राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मात्र, आजही अनेक गावे विकासाच्या कोसो दूर आहे. त्यामुळे ग्रामस्थ निवडणुकीवर बहिष्कार टाकतात. अशाच गावांचा आवाज त्यांच्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही 'मत द्यायचंय, पण कोणाला?' ही मालिका राबतोय. या मालिकेतील आजची 'ही' दुसरी कहाणी...

पेमरेवाडी मुलभूत सुविधांपासून वंचित

By

Published : Sep 23, 2019, 6:33 AM IST

अहमदनगर - राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. अनेक राजकीय नेते विकासाचा दावा करीत आहेत. मात्र, जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदार संघात असलेल्या डोंगराळ भागातील पेमरेवाडी गाव विकासाच्या कोसो दूर आहे. गावात साध्या मुलभूत सुविधा देखील नाही. रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्यण घेतला आहे.

पेमरेवाडी मुलभूत सुविधांपासून वंचित; विकासासाठी भाजपवासी झालेले वैभव पिचड आता तरी लक्ष देतील का?

२० ते २५ वर्षांपासून पिचड घराण्याची सत्ता -
पेमरेवाडी गावाचे शासकीय कामकाज संगमनेरमध्ये येते. संगमनेर तालुक्यापासून ४५ किलोमीटर भोजदारी गावाअंतर्गत पेमरेवाडी गाव येते. या गावाची लोकसंख्या जवळपास ३०० ते ४०० आहे. मात्र, हे गाव अकोले विधानसभा मतदारसंघात येते. या मतदारसंघावर जवळपास २० ते २५ वर्षांपासून पिचड घराण्याची सत्ता आहे. मधुकर पिचड यांनी काही वर्ष सत्ता गाजवली. त्यानंतर त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी आमदार म्हणून या भागाचे प्रतिनिधित्त्व केले. मात्र, स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर देखील या पेमरेवाडी हा दुर्गम भाग अजूनही दुर्गमच राहिलेला आहे. कुठलाही लोकप्रतिनिधींनी या गावाकडे कधी लक्षच दिले नाही.

रस्त्याअभावी दगावतात रुग्ण -
अतिदुर्गम, उंच डोंगरावर असलेली पेमरेवाडी आजही विकासापासून कोसोदूर आहे. रस्ते, पाणी या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाही. गावाला जाण्यासाठी १५ ते २० किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. त्यातही पक्का रस्ता नाही. त्यामुळे गुडघाभर चिखलातून कसरत करत त्यांना तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. गावात एखादा गंभीर रुग्ण असले तर रस्त्याअभावी त्याला वेळेत उपचार मिळू शकत नाही. प्रसंगी अनेकांचे मृत्यू होतात.

महामार्गापासून फक्त ५ किलोमीटर -
नाशिक-पुणे महामार्गापासून हे गाव फक्त ५ किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, गाव आणि महामार्ग यामध्ये जंगल आहे. त्यामुळे लोकांना महामार्ग गाठणे शक्य होत नाही. मात्र, जंगलातून या गावासाठी पक्का रस्ता बनवून दिल्यास काही मिनिटात महामार्ग गाठता येणार आहे. त्यामुळे त्यांना अनेक सोई-सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी गावकऱ्यांनी मागणी देखील केली. प्रत्येक निवडणुकीत लोकप्रतिनिधी येतात. आश्वासने देतात. मात्र, त्यानंतर गावाकडे कुणीही फिरकत नाही. बाळासाहेब थोरातांचा तालुका आणि आमदार वैभव पिचड यांचा मतदारसंघ असताना या भागातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

लोकसभा निवडणुकीवरही टाकला होता बहिष्कार -
गावात मुलभूत सुविधा नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. मात्र, त्यावेळी त्यांना फक्त आश्वासने मिळाली. त्यानंतर गावात कुणीही आले नाही. लोकसभेनंतर देखील गावाची स्थिती जैसे थे आहे. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्यण ग्रामस्थांनी घेतला आहे. आता विधानसभेच्या तोंडावर तरी भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार महोदय या गावाकडे लक्ष देतील का? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details