अहमदनगर -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेवून कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेवून महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे 500 बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरु केले आहे. यामुळे असंख्य कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा मिळाला आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या बांधित रुग्णांना मोफत उपचाराबरोबरच योगसाधनेचे धडे देवून रोज शेकडो रुग्ण उपचार घेवून आनंदाने आपल्या घरी जात आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यात रोज बाधित रुग्णांचा आकडा जरी मोठा असला, तरी बाधित रुग्णांसाठी जम्बो कोविड सेंटर हक्काचे आरोग्य केंद्र बनले आहे.
कोपरगाव येथे 30 ऑक्सिजन बेडचे डेडीकेटेड सेंटर -
मागील वर्षी आलेल्या जीवघेण्या कोरोना महामारीची दुसरी लाट अत्यंत प्रभावी असल्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे दररोज शेकडो बाधित रुग्ण आढळून येत आहेत. मागील वर्षी केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे मागील वर्षी कोरोनावर नियंत्रण मिळविता आले होते. मात्र, यावर्षी आलेल्या दुसऱ्या लाटेचे रौद्र रूप पाहता सतर्क होवून आमदार आशुतोष काळे यांनी वेळीच पाऊल उचलून 500 बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी एसएसजीएम महाविद्यालयाच्या वसतीगृहात 200 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु केल्यामुळे बाधित रुग्णांना येत असलेली अडचण दूर करून ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे 30 ऑक्सिजन बेडचे डेडीकेटेड सेंटर सुरु केले.
सर्व रुग्णांना मिळते दोन वेळ जेवण -
यावर्षी आलेल्या दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणात नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्यामुळे एसएसजीएम महाविद्यालयाच्या वसतीगृहात 100 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर येत्या एक दोन दिवसात कार्यान्वित होणार आहे. जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना मोफत उपचार दिले जात आहे. ज्या रुग्णांना तात्पुरत्या स्वरुपात ऑक्सिजनची आवश्यकता आहे. अशा रुग्णांना प्राथमिक स्वरुपात ऑक्सिजनदेखील उपलब्ध करून दिला जात आहे. उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांना रोज सकाळी नाश्ता, दोन वेळ जेवण दिले जात असून सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जम्बो कोविड केअर सेंटर शेजारीच श्री साईबाबा तपोभूमी असल्यामुळे सकाळ संध्याकाळ कानावर पडत असलेल्या साईंबाबांच्या आरतीचे स्वर बाधित रुग्णांसाठी आशिर्वाद ठरत असून त्यामुळे रोज शेकडो रुग्ण या ठिकाणी उपचार घेवून बरे होत आहेत.
नागरिकांना दिलासा -
सध्या या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये महिला व पुरुष स्वतंत्र उपचार घेत आहेत. दररोज शेकडो रुग्ण बाधित आढळून येत आहेत. रुग्णवाढ थांबण्याचे चिन्ह दिसत नसल्यामुळे येत्या काही दिवसांत जरी बाधित रुग्णांची संख्या वाढली, तरी आमदार आशुतोष काळे यांनी 100 बेडची तयारी करून ठेवली आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेची दाहकता जरी जास्त असली तरी 100 ऑक्सिजन बेडचे सुरु होणारे कोविड केअर सेंटर व करण्यात आलेली पूर्वतयारी पाहता सर्वसामान्य बाधित नागरिकांना या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा - थेट दिल्लीहून विमानाने अहमदनगरकरिता तीनशे रेमडेसेवीर पोहोच; खासदार सुजय विखेंचे प्रयत्न