संगमनेर Four Prisoners Escaped From Prison : संगमनेर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. संगमनेर शहर कारागृहाचे गज कापून बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपी पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडलीय. रोशन थापा ददेल, अनिल ढोले, खुन प्रकरणातील राहुल देविदास काळे आणि मच्छिंद्र जाधव अशी पसार झालेल्या आरोपींची नावे आहेत.
फिल्मी स्टाईलने काढला पळ : संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहात सध्या अनेक कैदी शिक्षा भोगत आहे. 7 नोहेंबर रोजी रात्री नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी होते. हे कर्मचारी बंदोबस्तात असतानाही कैदी जेलचे गज कापून पळून जाण्यात यशस्वी ठरले. या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले अत्याचारामधील आरोपी रोशन थापा ददेल, अनिल ढोले, खुन प्रकरणातील राहुल देविदास काळे आणि मच्छिंद्र जाधव हे आरोपी पळून गेले आहेत. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या आरोपींनी जेलमधून पळ काढला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंदोबस्तावरील पोलिसांचं दुर्लक्ष व्हावे यासाठी जेलमध्ये मोठ मोठ्यानं गाणे आणि आरत्या सुरू होत्या. या गोंधळात या चौघांनी जेलचे गज तोडले. ठरल्याप्रमाणे बाहेर एक कार अगोदरच येऊन थांबलेली होती. जेल तोडून हे कैदी या कारमध्ये बसून पसार झाले. कारागृहातून कैदी पळाल्यानं संगमनेर जेल प्रशासनाची इभ्रत पुन्हा चव्हाट्यावर आलीय.