अहमदनगर - संगमनेर शहरातील रहेमत नगर, जमजम कॉलनी, भारतनगर, अलका नगर, कोल्हेवाडी रस्ता, वाबळे वस्ती, उम्मद नगर, एकतानगर, शिंदेनगर, नाईकवाडापुरा हा भाग हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आला आहे. त्याच्या परिघात २ किमीचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केला आहे.
२३ एप्रिलला संगमनेर शहरातील या भागात ४ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने या भागातील प्रतिबंधात्मक आदेशात ७ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने अत्यावश्यक सेवा वस्तु विक्री इत्यादी ७ मे रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान तसेच या क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आदेशात म्हटले आहे.
या क्षेत्रांतून मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची शक्यता असल्याने या क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी क्षेत्र प्रतिबंधीत करणे, क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान प्रतिबंधित करणे व क्षेत्रातून वाहनांचे आवागमन यास प्रतिबंधित करणे आवश्यक आहे. त्यानुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून साथ रोग अधिनियम 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने खालील प्रमाणे कार्यवाही करावी असे आदेश देण्यात आले आहेत.
सार्वजनिक ध्वनिक्षेपकाद्वारे हा आदेश उद्घोषित करण्यात यावा.
कंट्रोल रुम स्थापन करुन 24 x 7 कार्यरत ठेवावी.