शिर्डी : शिर्डीतील श्रीरामनवमी यात्रेतील रहाट पाळणा तुटून झालेल्या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. साईसंस्थानच्या प्रसादालयासमोरील जागेत हे पाळणे लावण्यात आलेले आहेत. यातील एक खालीवर होणाऱ्या ट्रॉलीचा पाळणा अचानक तुटला. यामुळे पाळण्यातील काहीजण बाहेर फेकले गेले तर काहीजण पाळण्यात बसण्यासाठी बाजुला उभे होते. त्यांच्यावर हे पाळणे आदळल्याने अनेकजण जखमी झाले. या दुर्घटने ज्योती किशोर साळवे,(४५), किशोर पोपट साळवे,(५०) यांच्या पायांना मोठी गंभीर दुखापत झाली आहे. याशिवाय भूमी अंबादास साळवे, (१४) हिला डोक्याला जखम झाली आहे. तसेच प्रविण अल्हाट, (४५) हा तरुणही जखमी झाला आहे.
चार जण जखमी :जखमींना तातडीने संस्थानच्या साईबाबा रूग्णालयात हलवण्यात आले. रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक व उपसंचालक डॉ. प्रितम वडगावे तातडीने अपघात कक्षात दाखल झाले. त्यांनी रूग्णांवर पुर्णपणे मोफत उपचार करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या. डॉ. खुराणा, डॉ. प्रशांत गोंदकर, डॉ. राजु तलवार, डॉ. समीर पारखे यांनी तातडीने रूग्णांवर उपचार सुरू केले. शिर्डीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनीही आपल्या सहकार्यांसह तातडीने घटनास्थळी, नंतर रूग्णालयात धाव घेतली. या घटनेमुळे रामनवमी उत्सवाला गालबोट लागले असुन साळवे दाम्पत्य अत्यंत गरीब असुन त्यांच्या पायांना गंभीर इजा झालेली आहे.