अहमदनगर - सहा नोव्हेंबर रोजी अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागली त्यावेळी ड्युटीवर असलेले वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आयसीयू विभागात गैरहजर होते, त्याचबरोबर बराच काळ लोटूनही ते आले नाहीत किंवा आल्यावर मदत करताना दिसून आले नाही. या दरम्यान नातेवाईकांनी मदत केली आणि काही रुग्णांनी स्वतःच बाहेर येण्यासाठी धडपड केली. जर कर्मचारी उपस्थित असते आणि त्यांनी तातडीने हालचाल करून मदत कार्य केले असते तर, काही रुग्णांचे निश्चित प्राण वाचले असते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी माध्यमांना दिली आहे.
माहिती देताना पोलीस अधीक्षक हेही वाचा -बीजमाता राहीबाई पोपेरे यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते 'पद्मश्री' पुरस्काराने गौरव
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा निलंबित
रुग्णालयातील आग आणि अकरा रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह दोन वैद्यकीय अधिकारी आणि एका परिचारिकेला निलंबित तर, दोन परिचारिकांचे सेवा समाप्तीचे आदेश काढत कारवाई केली आहे. त्याचबरोबर, पोलिसांनी सुरुवातीला आईपीसी कलम 304 - अ नुसार अज्ञात व्यक्तींवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्या तपासात जिल्हा रुग्णालयात तील आयसीयू विभागाला आग लागली त्यावेळी एक वैद्यकीय अधिकारी आणि चार परिचारिका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आयसीयू विभागात अनुपस्थित दिसून आले आहेत. आग लागल्यानंतर आणि आयसीयूत धूर पसरत असताना नातेवाईक आपल्या रुग्णांना आयसीयूतून बाहेर काढत होते तर, काही रुग्ण स्वतःच व्हेंटिलेटर, ऑक्सिजन स्वतःच्या हाताने काढत अक्षरशः रांगत बाहेर पडत होते, मात्र यावेळी ड्युटीवर असलेले कर्मचारी उपस्थित नव्हते, तसेच त्यांची या कामी मदत दिसून येत नसल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून एक वैद्यकीय अधिकारी आणि तीन परिचारिका यांना अटक केल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या चारही जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
परिचारिका संघटना संतापल्या
जिल्हा रुग्णालयात लागलेली आग आणि अकरा जणांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूबद्दल आरोग्य मंत्र्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह दोन वैद्यकीय अधिकारी आणि तीन परिचारिका यांच्यावर कारवाई केलेली असताना गुन्हा फक्त परिचारिका आणि एका महिला डॉक्टरवर होत अटक झाल्याने परिचारिका संघटना संतापल्या आहेत, तर जिल्हा शासकीय रुग्णालय, खासगी रुग्णालयात आज गुरुवारी ओपीडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला डॉक्टर, परिचारिका यांच्यावरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा राज्यभरात परिचारिका कामबंद आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत काल जिल्हा रुग्णालयातील आवारात शासकीय - खासगी डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांची एक सभा झाली. यात पोलीस, शासन उच्च अधिकारी, इतर शासकीय विभाग यांच्यावर कारवाई न करता निष्काम सेवा करणाऱ्या परिचरिकांवर गुन्हे दाखल करून अटक करत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा -VIDEO : पंधरा फूट खोल खड्डयात पडलेल्या मुलीला वाचवण्यात यश