भोजदरी गावातील पाणी टंचाईविषयी सांगताना गणपत हांडे अहमदनगर :संगमनेर तालुक्यातील दुर्गम भागातील भोजदरी गावामध्ये ऐन पावसाळ्यात देखील पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. गावकऱ्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबविण्यासाठी गावचे माजी पोलीस पाटील गणपत हांडे यांनी पुढाकार घेऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. स्वत:ची बागायती जमीन असतानाही पिकांना पाणी न देता स्वत:च्या विहिरीतील पाणी सार्वजनिक टाकीत टाकून गावकऱ्यांची तहान ते भागवत आहेत.
पिकाला पाणी न देता गावकऱ्यांना पाणी :एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना अजूनही खेडोपाडी मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नसल्याचे हे वास्तव दर्शन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाचा नारा दिला; मात्र आजही संगमनेर तालुक्यातील पठार भागातील अनेक गावे नेटवर्क सेवेपासून वंचित आहेत. याचबरोबर चारही बाजूंनी डोंगरदऱ्यात वसलेल्या भोजदरी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी अद्यापही संघर्षच करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यात गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता; मात्र ही गोष्ट गावचे माजी पोलीस पाटील गणपत हांडे यांना समजली. त्यानंतर त्यांनी स्वत: पुढे येत 8 एकर शेतातील सोयाबीन पिकांना पाणी न देता गावाला पाणी देण्याचा निर्णय घेतला.
भोजदरी गावठाणमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे लोकांना पाणी मिळत नव्हते; मात्र अशा कठीण परिस्थितीत गावचे माजी पोलीस पाटील गणपत हांडे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत स्वत:च्या विहिरीतून गावाला पाणी देत गावची तहान भागवली आहे. त्यांच्या या कार्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सत्कार केला जाणार आहे. - विठ्ठल शिरोळे, ग्रामसेवक, भोजदरी ग्रामपंचायत
हांडेंच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक :सरपंच, ग्रामसेवक यांच्याशी चर्चा केली; पण ग्रामपंचायतीकडे पाईप उपलब्ध नव्हते. त्यानंतर स्वत: हांडे यांनी विहिरीपासून चाळीस पाईप एकमेकांना जोडून थेट पाणीपुरवठा करणाऱ्या गावच्या टाकीत पाणी आणून सोडले. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून हांडे हे गावची तहान भागवण्याचे काम करत आहेत. जोपर्यंत विहिरीला मुबलक पाणी येत नाही तोपर्यंत गावाला पाणी देण्याचा निर्णय माजी पोलीस पाटील हांडे यांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले आहे.
पोलीस पाटलांच्या पुढाकाराने पाणीप्रश्न मिटला :अहमदनगर जिल्ह्यात सुरूवातीला जो पाऊस झाला त्यानंतर अद्यापही पाऊस झालेला नाही. त्यामुळे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी संपल्याने गावात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता; मात्र अशातच गावचे माजी पोलीस पाटील गणपत हांडे यांनी स्वत: पुढे येत आपल्या विहिरीचे पाणी गावाला दिले आहे. त्यामुळे गावचा पाणीप्रश्न मिटला असल्याचे भोजदरी गावातील सामाजिक कार्यकर्ते शरद तपासे म्हणाले आहेत.