अहमदनगर -जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी खासदार मारुती देवराम उर्फ दादा पाटील शेळके (वय 79) यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आज (शनिवारी) दुपारी ३ वाजता त्यांच्या खारेकर्जुने या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शेळके यांच्या मागे पत्नी, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक असलेले पुत्र रावसाहेब, तसेच ३ मुली, असा परिवार आहे. रक्तातील साखर वाढल्याने शेळके यांना नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवस त्यांच्यावर पुण्यातही उपचार करण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे दाखल करण्यात आले होते. औषधोपचार सुरू असतानाच आज रात्री दहाच्या सुमारास शेळके यांची प्राणज्योत मालवली.
४ वेळा आमदार, तर २ वेळा खासदार -
दादा पाटील ४ वेळा आमदार आणि दोनदा खासदार होते. मात्र, त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. त्यांच्या वागणुकीत कोणताही डामडौल कधीच नव्हता. वयाच्या 21 व्या वर्षीच दादा पाटलांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. ते 1962 पासून 1978 पर्यंत सलग जिल्हा परिषद सद्स्य झाले. नगर तालुका पंचायत समितीचे सभापती व उपसभापती ही पदेही त्यांनी भूषविली. सन 1978 पासून 1994 पर्यंत ते विधानसभेवर सलग निवडून गेले. पुढे 1994 व 1996 अशा दोन वेळा ते खासदारही झाले.
दादा पाटलांनी नगर तालुक्यातील वाळकी येथे सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. अवघ्या ८ महिन्यात कारखाना उभा करून त्यांनी 2001 मध्ये पहिला गळीत हंगाम सुरू केला होता. शेती व उसाच्या प्रश्नांबाबतचा त्यांचा अभ्यास अतिशय दांडगा होता. नगर तालुक्यात सुमारे 30 माध्यमिक विद्यालये स्थापन करून स्थानिक संस्थांकडे सुपूर्द केली. हीच विद्यालये स्वतःच्या संस्थेमार्फत सुरू केली असती, तर दादा पाटील तालुक्याचे 'शिक्षणसम्राट' झाले असते, असेही बोलले जाते. मात्र, त्यांनी शिक्षणाचा 'धंदा' केला नाही.