अहमदनगर -शिर्डी नगरपंचायतचे भाजपचे माजी नगरसेवक व शहर उपाध्यक्ष सुरेश आरणे यांनी अखिल भारतीय काँग्रेस पक्षामध्ये राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे. यावेळी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, काँग्रेसचे शिर्डी विधानसभा मतदार संघाचे नेते सुरेश थोरात, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. एकनाथ गोंदकर, जिल्हा सरचिटणीस श्रीकांत मापारी, शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, युवक शहराध्यक्ष अमृत गायके उपस्थित होते.
भाजपचे 'कमळ' सोडून सुरेश आरणेंनी धरला काँग्रेसचा 'हात' - माजी नगरसेवक सुरेश आरणे काँग्रेसमध्ये दाखल
भाजपचे माजी नगरसेवक व शहर उपाध्यक्ष सुरेश आरणे यांनी अखिल भारतीय काँग्रेस पक्षामध्ये राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.
काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करावे.
काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवावा, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून काँग्रेसने गोरगरिबांसह प्रत्येक घटकाकरिता घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील रहावे. सर्वांनी एक दिलाने काम करत असताना काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करावे अशा सूचना महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केल्या.
सुरेश आरणे यांचा काँग्रेसमध्ये योग्य तो सन्मान केला जाईल
शिर्डी शहरातील गुलाब विक्री करणारे, शिर्डी गाईड्स, फेरीवाले यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्या बरोबरच गोरगरिबांच्या समस्यांना घेऊन सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे भाजपचे माजी नगरसेवक सुरेश आरणे यांचा काँग्रेसमध्ये योग्य तो सन्मान केला जाईल. त्याच बरोबर तळागाळातील बेधडक तरुणांना सोबत घेऊन शिर्डी शहरातील काँग्रेस बळकट करत असताना आगामी शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुकीत प्रस्थापितांच्या विरोधातील लढा यशस्वीपणे लढला जाईल, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनी सांगितले.