शिर्डी (अहमदनगर)Foreign Currency Issue Shirdi:साईबाबांच्या मंदिरातील आणि परिसरातील दक्षिणा पेट्यांमध्ये भाविकांनी विदेशी चलन टाकू नये, असं थेट साईबाबा संस्थानच्या वतीनं भाविकांना आवाहन करण्यात येत असल्यानं भाविकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय. कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी वर्षाकाठी देश-विदेशातील असंख्य भाविक येतात. यात अनिवासी भारतीय आणि विदेशातील भाविकांची संख्याही मोठी असते. हे भाविक साईंच्या दानपात्रात विदेशी चलन देणगी स्वरुपात टाकतात. त्यानंतर साई संस्थानकडून हे विदेशी चलन भारतीय रुपयात रुपांतरीत केले जाते. (Registration of Foreign Exchange)
'यामुळे' विदेशी चलन स्वीकारण्यास नकार :साई संस्थानची विदेशी चलन विनिमयाची नोंदणी नूतनीकरण झालेली नाही. त्यानंतर साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या विश्वस्तांनी 'केवायसी'साठी आपली कागदपत्रे दिली; मात्र त्यातही तांत्रिक त्रुटी आढळल्या. त्यामुळे त्याची पूर्तता करण्याआधी न्यायालयाकडून ट्रस्ट मंडळ बरखास्त केलं गेलं. त्यानंतर आलेल्या त्रिसदस्यीय समितीने 'केवायसी'साठी आपले डॉक्युमेंट दिले असून ते मंजूर होऊन लायसन्स नूतनीकरण होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे जास्त विदेशी चलन साठून राहू नये यासाठी साई संस्थानने सध्या विदेशी चलन न घेणचं पसंत केलं आहे. म्हणूनच भक्तांना दान पेटीत विदेशी चलन न टाकण्याची विनंती केली असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली आहे.