अहमदनगर -नगर-कल्याण महामार्गावरून अवैधरित्या शहरात आणला जात असलेला जवळपास साडेपाच लाख रुपयांचा दारूसाठा जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दारूचे ७७ बॉक्स आणि दोन चारचाकी वाहने असा एकूण पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई, पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त
नगर-कल्याण महामार्गावरून अवैधरित्या शहरात आणला जात असलेला जवळपास साडेपाच लाख रुपयांचा दारूसाठा जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केला आहे.
नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरून भाळवणी येथून एका वाहनातून अवैधरित्या दारूसाठा नगर शहरात आणला जात असल्याची गुप्त माहिती जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यासोबत दारू साठ्याचा मालक स्कॉर्पिओ गाडीतून येत असल्याचेही खबऱ्याने सांगितले होते. त्या अनुषंगाने शहरात नेप्तीनाका इथे गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा लावला. ही दोन्ही वाहने नेप्तीनाका इथे येताच पोलीस पथकाने वाहने अडवून झडती घेतली.
यावेळी एका वाहनात अवैधरित्या वाहतूक होत असलेली दारूचे 77 बॉक्स आढळून आले. या दारूची किंमत 5 लाख 41 हजार इतकी आहे. पोलिसांनी या प्रकरणी नरेंद्र राजेंद्रसिंग रौतोला (डेहराडून) आणि बबन भाऊसाहेब काकडे (गोरेगाव, पारनेर) या दोघांना अटक केली आहे. गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत पुढील तपास तोफखाना पोलिसांना सुपूर्द केला आहे.