अहमदनगर -जिल्ह्यात कर्जत पोलीस ठाण्यातील तुरुंगामधून खून, बलात्कार, गावठी पिस्तुल विक्री अशा गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपी तुरुंगाचे छत गज तोडून पळून गेल्याचे समोर आले आहे. ही घटना रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. या प्रकरणी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपी कर्जत तुरुंगाचे छत तोडून फरार - Ahmednagar crime news
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्याच्या तुरुंग पाच आरोपी फरार झाले आहेत. त्यांच्यावर पिस्तुल विक्री, खून, बलात्कार असे गंभीर गुन्हे आहेत.
कर्जत पोलीस ठाण्यातील तुरुंगामधील कोठडी क्रमांक तीनमधील गंभीर आरोप असलेले अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत, ( दोघे रा. जामखेड ), ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे, (जवळा जामखेड), मोहन कुंडलिक भोरे, गंगाधर लक्ष्मण जगताप (रा. महाळंगी ता. कर्जत) हे आरोपी फरार झाले आहेत. त्यांनी तुरुंगाच्या छतावरील प्लायवूड कापले. यानंतर त्यांनी कौलारूचे छत काढून त्यातून पलायन केले. यामधील ज्ञानेश्वर कोल्हे जामखेड तालुक्यातील असून पिस्तूल विक्री करणे यासह अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे. अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत आणि मोहन कुंडलिक भोरे हे जामखेड येथील आरोपी मुंबईतील टरबूज व्यापाऱ्याच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटकेत होते, तर गंगाधर जगताप हा कर्जत तालुक्यातील आरोपी बलात्काराच्या गुन्ह्यांमधील होता. या सर्व आरोपींना एका कोठडीमध्ये ठेवले होते. तुरुंगामधून पाच आरोपी पळून गेल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली असून पोलीस पथके विविध भागांमध्ये या आरोपींचा शोध घेत आहेत.