शिर्डी (अहमदनगर) - भारत गौरव या योजनेअंतर्गत पहिली खासगी रेल्वेगाडी ( First Private Train ) धावली. तिचे उद्घाटन कोईम्बतूर येथे करण्यात आले. ही पहिली खासगी रेल्वे कोईम्बतूर ते शिर्डी या दरम्यान धावली आहे. साऊथ स्टार असे नाव देण्यात आलेली ही गाडी पहाटे शिर्डीमध्ये दाखल झाली.
साईनगर स्थानकावर ढोलताश्यांच्या गजरात स्वागत - भारत गौरव योजनेअंतर्गत खासगी आणि पर्यटन कंपन्यांना रेल्वेकडून भाडेतत्वावर गाड्या देण्यात आल्या आहे. त्यानुसार MNC कंपनीने ही गाडी भाडेतत्त्वावर घेतलेली. पहिली खासगी ट्रेन ही कोईम्बतूर ते साईनगर शिर्डी या मार्गावर धावली. मंगळवारी कोईम्बतूर येथून निघालेली खासगी सेवा प्रणालीतील साई सदन एक्सप्रेस दोन दिवसांच्या प्रवासानंतर सुमारे 820 साईभक्तांना घेऊन शिर्डीच्या साईनगर रेल्वे स्थानकावर पहाटे 6 वाजेच्या सुमारास दाखल झाली. यावेळी साईनगर स्थानकावर रेल्वेगाडीचे ढोलताश्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. साई सदन एक्सप्रेस ही कोईम्बतूर येथून निघाल्यानंतर तिला मंत्रालयम या ठिकाणी पाच तासाचा थांबा देण्यात आला होता. या रेल्वेने शिर्डीत आलेल्या प्रवाशांनी शिर्डीला थेट सेवा आणि तीही चांगल्या दर्जाची सेवा मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.