शिर्डी(अहमदनगर) - संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथील जंगलाला बुधवारी रात्रीच्या सुमारास अचानकपणे लागलेला वणवा युवकांच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे हजारो एकर वनसंपदा वाचविण्यास यश मिळाले आहे. सावरगावतळ गावास खूप मोठी वनसंपदा लाभली असून जवळपास आठशे हेक्टर पेक्षाही अधिक क्षेत्रावर येथे दाट जंगल आहे. या जंगलात विविध प्रकारचे झाडे, झुडपे याचबरोबर अनेक दुर्मिळ वनौषधी वनस्पती असून, जंगली प्राणी, पशु, पक्षी, श्वापदे यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. गावकरी आणि वनविभाग येथे सातत्याने वृक्षारोपण करत आपली वनसंपदा अधिक संपन्न करण्याचा प्रयत्न करत आहे.
बुधवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास अचानकपणे येथील डोंगर क्षेत्रावरील काही भागातील जंगलाला अचानकपणे मोठा वणवा लागला. ह्या वनव्याने पाहता पाहता मोठे उग्र रूप धारण केले होते. गावातील अनेक तरुणांनी या आगीची, वनव्याची माहिती पोलीस पाटील गोरक्ष नेहे आणि सरपंच दशरथ गाडे यांना कळविली. पोलीस पाटील नेहे यांनी जंगलाला लागलेल्या वनव्याची माहिती तातडीने वनविभागाच्या अधिकारी यांच्याबरोबर तहसीलदार यांनाही कळविली. पोलीस पाटील आणि सरपंच यांनी गावातील वनसंपदेवर आलेले हे आरिष्ट समजून गावातील युवकांना वणवा विझविण्यासाठी मदतीचे आवाहन करताच जवळपास दोनशे ते अडीचशे युवक वणवा विझविण्यासाठी वनव्याच्या दिशेने धावले.