अहमदनगर - माजी खासदार असे नंबर प्लेटवर लिहिलेल्या दिलीप गांधी यांच्या कारमधून फिरणाऱ्या दोघांना आज (शुक्रवारी) पोलिसांनी काठ्यांचा प्रसाद देत गुन्हाही दाखल केला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे आज स्वतः धरती चौक इथे रस्त्यावर उतरत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत होते. दिलीप गांधी यांनी मात्र प्रशासनाचा निषेध केला आहे
माजी खासदार गांधींच्या गाडीतून फिरणाऱ्या दोघांना पोलिसांचा 'प्रसाद'; गुन्हा दाखल - माजी खासदार दिलीप गांधी
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची आणि माझी बदनामी होईल या उद्देशाने केल्याचा आरोप दिलीप गांधी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. याबाबत आपण देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वाहनचालक अत्यावश्यक सेवेत नसल्याचे लक्षात येताच एकीकडे पोलीस काठ्यांचा प्रसाद देत होते. गाडीची हवा सोडण्याबरोबर कायदेशीर कारवाई पण करत होते. अशात एमएच १६- बीपी २१२१ असा नंबर असलेले माजी खासदार दिलीप गांधी यांचे आलिशान चारचाकी वाहन जिल्हाधिकाऱ्यांनी अडवले. कारच्या नंबर प्लेटवर कमळाच्या चिन्हासह माजी खासदार असे लिहलेले होते. मात्र, गांधी या गाडीत स्वतः नव्हते. आम्ही जंतूनाशकाची फवारणी करण्यासाठी गेलो असल्याचे या गाडीत असलेल्या रोशन विजयकुमार गांधी आणि कपिल पंढरीनाथ माने यांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी या दोघांना यथेच्छ काठ्यांचा प्रसाद दिला. तसेच वाहनातील या दोघांवर कलम १८८ प्रमाणे कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची आणि माझी बदनामी होईल, या उद्देशाने केल्याचा आरोप दिलीप गांधी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. याबाबत आपण देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी द्विवेदी स्वतः मोठा पोलीस फौजफाटा सोबत घेऊन कसलेही सोशल डिस्टन्सिंग न पाळता फिरत आहेत. मात्र, मी पक्षाच्या आदेशाने सामाजिक बांधीलकीतून मोफत अन्न, औषध फवारणी यासाठी काम करत असताना प्रशासनाने जाणीवपूर्वक माझ्या स्वीय सहायक आणि ड्रायव्हरवर मारहाण करत कारवाई केल्याचे गांधी यांनी म्हटले आहे.