अहमदनगर - साईबाबा संस्थानच्या वतीने मंदिर प्रवेशद्वारावर भक्तांनी भारतीय पोषाखात येण्यासंबंधी आवाहन करण्यात आले होते. यानंतर ३ ते दिनांक ७ डिसेंबर या कालावधीत १५ हजार ५०६ साईभक्तांनी आपल्या प्रतिसादात्मक प्रतिक्रिया नोंदवल्याची माहिती संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.
पोषाख प्रतिक्रिया : जाणून साईबाबा मंदिरातील भक्तांचे अभिप्राय साईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी येणारे भक्त सभ्य पोषाखात येत नसल्याच्या तक्रारी काही भक्तांनी संस्थान प्रशासनाकडे केलेल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन संस्थान प्रशासनाकडून सभ्यतापूर्ण पोषाख परिधान करून मंदिरात येण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते. तसे फलक मंदिर प्रवेशद्वारांवर लावण्यात आले आहेत. या फलकांच्या माध्यमातून संस्थानने भाविकांना कुठलीही सक्ती केली नसून हे फक्त आवाहन असल्याचे मंदिर समितीने स्पष्ट केले. तरी या फलकाबाबत साईभक्तांचे मत जाणून घेण्यासाठी संस्थानच्या वतीने दर्शनरांगेत अभिप्राय नोंदवही व फॉर्मची व्यवस्था करण्यात आली आहे.
१५ हजार ५०६ साईभक्तांनी आपल्या प्रतिसादात्मक प्रतिक्रिया नोंदवल्याची माहिती संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली. त्यानुसार दिनांक ०३ डिसेंबर ते दिनांक ०७ डिसेंबर २०२० या कालावधीत साई दर्शनासाठी आलेल्या सुमारे १५ हजार ५९९ साईभक्तांनी मंदिर प्रवेशद्वारांवर लावण्यात आलेल्या फलकांबाबत अभिप्राय नोंदवलेला आहे. यामध्ये १५ हजार ५०६ साईभक्तांनी कोणताही आक्षेप घेतलेला नसून सदरचा निर्णय योग्यच आहे, असा अभिप्राय नोंदवलेला आहे. तर ९३ साईभक्तांनी हा निर्णय अयोग्य असल्याचे सांगत त्यांचा अभिप्राय नोंदवल्याची माहिती कान्हूराज बगाटे यांनी दिली.
साईभक्तांचे मत जाणून घेण्यासाठी संस्थानच्या वतीने दर्शनरांगेत अभिप्राय नोंदवही व फॉर्मची व्यवस्था करण्यात आली आहे.