अहमदनगर- जिल्ह्यातील नेवासा येथील प्रशांत वाघ आणि पाथर्डी येथील एका मुलीने घरच्यांचा विरोध असतांनाही आंतरजातीय विवाह केला होता. या रागातून मुलीच्या वडीलांनी नातेवाईकांसह नेवासा येथे येऊन आंतरजातीय विवाह केलेल्या जावयास त्यांच्या घरासमोर ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नेवासा पोलीसांनी तीन गाड्यांसह सात जणांना अटक केली असून त्यांच्याकडील हत्यारही जप्त केले आहे.
नेवासा येथील प्रशांत वाघ याचा पाथर्डी येथील माणिक यांच्या मुलीसोबत 1 मार्चला आंतरजातीय विवाह झाला होता. या विवाहाला मुलीच्या कुटुंबियांचा विरोध होता. यामुळे चिडलेल्या मुलीकडील नातेवाईकांनी नेवासा शहरातील कडू गल्ली येथे राहणाऱ्या वाघ यांच्या घरासमोर जाऊन प्रशांतवर वार केला. पण, मोटारसायकल आडवी आल्याने हा वार चुकला. त्यामुळे प्रशांत मोठ्याने ओरडत घरात पळाला. यावेळी मुलीच्या भावाने त्याच्यावर पिस्तुल रोखली तसेच इतर वाहनांतून आलेल्या व्यक्तीच्या हातात चाकू, रॉड, एअर गन होते. प्रशांतच्या ओरडण्याने गल्लीतील लोक जमा झाले. हे पाहून आरोपी आपापल्या वाहनांत बसून नेवासा फाट्याच्या दिशेने पळाले. या घटनेची माहिती प्रशांतने पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी तत्परता दाखवून भानसहिवरा रस्त्यावर हॉटेल सावताजवळ आरोपींना पकडले.