अहमदनगर : आजवर आपण अनेक फॅशन शो पाहिले असेल विविध मॉडेलला रॅम्प वॉक करताना बघितलं असेल. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात आयोजीत एका अनोख्या फॅशन शो मध्ये चक्क एकल महिला रॅम्प वॉक करताना दिसल्या. या अनोख्या फॅशन शो स्पर्धेची सर्वत्र चर्चा होत आहे. या स्पर्धेत एकच महिलांबरोबरच राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी देखील रॅम्प वॉक केले. या अनोख्या स्पर्धेचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.
फॅशन शो स्पर्धेचे आयोजन : कोपरगाव येथील सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान सामाजिक संस्था, डॉ. ए जी फिल्म प्रोडक्शन आणि स्टारडम इंडिया या संस्थेच्या वतीने एकल महिलांसाठी हिरकणी महाराष्ट्राची ही फॅशन शो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अकोले येथील सुरेखा पुंजा मंडलिक या प्रथम विजेत्या ठरल्या आहे. तर कोपरगाव येथील रश्मी शिवनारायण शर्मा द्वितीय आणि बारामती येथील अश्विनी तावरे तृतीय क्रमांकाचे विजेते ठरल्या आहे.
यासाठी स्पर्धेचे आयोजन : देशात विधवा महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यांना मान सन्मानापासून बाजूला ठेवले जाते. विधवा प्रथा बंद व्हावी व त्या महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी कायदा झाला तरी आजही समाजातील काही घटक विधवांना दुय्यमस्थानीच ठेवतात. परंतु सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानने घटस्फोटीत परितक्त्या आणि विधवा महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्यामधील प्रतिभाशक्ती जागृत करण्यासाठी फॅशन शो स्पर्धा आयोजित केली होती. या अनोख्या स्पर्धेत 60 पेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदवला.