अहमदनगर -आज बलिप्रतिपदा दिनी राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून, केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत जोरदार आंदोलन केले. किसान सभेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राज्यातील 21 जिल्ह्यांमधून हजारो पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आली आहेत. अशी माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिली.
शेतकऱ्याचे प्रश्न पत्राद्वारे पंतप्रधानांच्या दारी
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, मात्र त्या तुलनेत सरकारकडून करण्यात येणारी मदत अतिशय कमी आहे. या मदतीत वाढ करावी. पीकविमा योजनेची योग्य अंमलबजावणी करावी. शेतकऱ्यांच्या प्रत्येक उत्पादनाला हमीभाव देण्यात यावा. देशभरातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी व्यापक मोहीम राबवण्यात यावी. शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे रद्द करावेत. शेतकऱ्यांना व्यापार व तंत्रज्ञान स्वातंत्र्य द्यावे. कसत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात. आदिवासी लोकांना विस्थापीत करणाऱ्या जाचक इको सेन्सिटिव्ह धोरणात बदल करावेत. अशा विविध मागण्या या पत्रांच्या माध्यमातून करून, आज लेटर टू पी. एम. या मोहिमेत हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.