अहमदनगर -उसाला उत्पादन खर्चावर आधारित भाव साखर कारखान्यांकडून मिळत नसल्याने नगर जिल्ह्यातील शेतकरी आता पारंपरिक ऊस पिकाचे उत्पादन घेण्याऐवजी केळी या पिकाकडे वळत असल्याने जिल्ह्यात केळी पिकांचे क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचा जिल्हा व उसाचा बालेकिल्ला, अशी ओळख असलेल्या या जिल्ह्यात ऊस पिकावर केळीचे आक्रमक होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
बदलत्या परिस्थितीनुसार आपणही उत्पादनात बदल केले पाहिजे म्हणून आपण केळीच्या पिकांकडे वळत असल्याचे केळी उत्पादक शेतकरी सांगतात. यापूर्वी पारंपरिक ऊस उत्पादन घेत असताना उसाचे बेणे, खत, मजूर, कापणी, तोडणीचा खर्च यांचा विचार करता उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव साखर कारखान्यांकडून मिळत नाही. उसाचे उत्पादन एकरी 70-75 टन मिळाले तरी त्याला प्रतीटन 2000 ते 2200 रुपये भावाप्रमाणे एकरी दीड लाखाचे उत्पन्न मिळते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
त्या तुलनेत केळीच्या उत्पादनात एकरी उसाच्या दुप्पट म्हणजे सुमारे तीन-साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न हमखास मिळत आहे. शिवाय व्यापारी स्वतःहून थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून शेतात येऊन केळी तोडून घेऊन जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ शोधण्यासाठी भटकंती करावी लागत नाही. याऊलट चांगला दर्जा टिकवून ठेवला तर निर्यातदार व्यापारीही थेट संपर्कात येत आहेत. त्यातून शेतकऱ्यांना अधिक प्रेरणा मिळत आहे. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढत आहे.