अहमदनगर - टोमॅटोचे दर अचानक कोसळल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. टोमॅटो उत्पादकांना त्यांच्या अडचणीच्या काळात सरकारने एकरी किमान 50 हजार रुपयांचे तातडीने अनुदान द्यावे, या मागणीसाठी किसान सभा व समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 28 ऑगस्ट) अकोले तालुक्यातील समशेरपूर बाजार समितीमध्ये तीव्र आंदोलन केले आहे.
टोमॅटो उत्पादकांच्या प्रश्नांबाबत समशेरपूर बाजार समितीत आंदोलन किसान सभा व समविचारी शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनामध्ये यावेळी परिसरातील शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने सामील झाले होते. राज्यात सध्या टोमॅटो उत्पादकांवर प्रचंड संकट आले असताना राज्यातील सत्ताधारी व विरोधक मात्र भलत्याच विषयांवर एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. ही अत्यंत संतापजनक बाब आहे. राज्यकर्त्यांनी व विरोधकांनी या संकटाच्या काळात तरी एकमेकांवरील चिखलफेक थांबवावी व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याबद्दल गांभीर्याने पावले टाकावीत. असे झाले नाही तर मात्र सत्ताधारी व विरोधक दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या दारात टोमॅटो ओतण्याचे आंदोलन हाती घ्यावे लागेल, असा इशारा यावेळी किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.
टोमॅटो दराचा प्रश्न सुटावा यासाठी 'या' मागण्या करण्यात आल्या
- नेपाळ पाकिस्तान व बांगलादेश या शेजारील राष्ट्रांना टोमॅटोची निर्यात करण्यात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवाव्यात.
- महाराष्ट्राबाहेर इतर राज्यात टोमॅटोची कोठे मागणी आहे.
- याचा तातडीने शोध घेऊन या राज्यांना टोमॅटो पुरविण्यासाठी महाराष्ट्राच्या पणन विभागाने तातडीने पावले उचलावीत.
- टाळेबंदीचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी टोमॅटो प्रक्रिया उद्योग बंद आहेत, विशेष प्रोत्साहन व सवलती देऊन हे उद्योग तातडीने सुरू करण्याबाबत सरकारने पावले उचलावीत.
- टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यायला लागू नये म्हणून बाजार समित्यांमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये कोल्ड स्टोरेजची उभारणी करावी.
- टोमॅटो उत्पादकांना माल तारण कर्ज उपलब्ध करून द्यावे.
- टोमॅटोचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पावले उचलावीत.
- टोमॅटो पिकासाठी वापरली जाणारी कीटकनाशके, विषाणू विरोधी औषधे, पोषके व खते यांची किंमत वाढवून कंपन्यांकडून टोमॅटो उत्पादकांचे अतोनात शोषण केले जात आहे.
- सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करून टोमॅटो उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व निविष्ठा, खते, कीटकनाशके योग्य दरात शेतकऱ्यांना मिळतील यासाठी हस्तक्षेप करावा.
हेही वाचा -पाथर्डी तालुक्यात अल्पवयीन मुलीचे लग्न; नवरदेवासह 25 जणांंविरोधात गुन्हा दाखल