अहमदनगर- उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्याचे अकोले तालुक्यातील बंद केलेले काम उच्च न्यायालयाने आदेश देऊनही सुरू झालेले नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी संतप्त झाले आहेत. जलसंपदा विभाग व जिल्हाधिकारी यांनी आगामी २३ मेपर्यंत काम सुरू न केल्यास निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने सोमवार दि .२७ मे रोजी तळेगाव दिघे येथील चौफुलीवर सकाळी नऊ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी काकडी येथे झालेल्या बैठकीत केली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही निळवंडे कालव्याचे काम बंद; शेतकरी करणार रास्ता रोको - निळवंडे
निळवंडे प्रकल्पाची पायाभरणी होऊन अठ्ठेचाळीस वर्ष होत आली आहेत. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही या प्रकल्पाचे कालवे शासनाने अद्याप पूर्ण केलेले नाहीत. त्यामुळे निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे.
निळवंडे प्रकल्पाची पायाभरणी होऊन अठ्ठेचाळीस वर्षे होत आली आहेत. तरीही या प्रकल्पाचे कालवे अद्याप पूर्ण केलेले नाहीत. निळवंडे कालवा कृती समितीने राज्य सरकारकडून निधी मिळण्याची आशा मावळल्यावर केंद्रीय जलआयोगाकडे धाव घेतली आणि वेगवर्धित सिंचन प्रकल्पात समावेश करण्यासाठी २०१४ अखेर चौदा मान्यता मिळवल्या. राज्य सरकारने रखडवलेल्या दोन मान्यता मिळवण्यासाठी कालवा कृती समितीचे शेतकरी विक्रांत काले व पत्रकार नानासाहेब जवरे यांनी अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सप्टेंबर २०१६ मध्ये जनहित याचिका दाखल केली आणि केंद्रीय जल आयोगाकडून एक आणि राज्य शासनाने रखडवलेल्या दोन अशा तीन मान्यता मिळवल्या. २६ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद खंडपीठाने निधी देण्याबाबत व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले असून लाभक्षेत्रा बाहेर पाणी पळवापळविलाही स्थगिती दिलेली आहे.
औरंगाबाद खंडपीठाचे न्या. गंगापूरवाला व न्या. अरुण ढवळे यांनी अकोलेतील काम सुरू करण्यास जी काही मदत लागेल ती शासनाने त्वरित उपलब्ध करून, येणारे अडथळे निवारण करून काम चालू करण्याचे आदेश दिले होते. त्याला पंधरा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. तरी जलसंपदा विभाग थंडच दिसत आहे. काम चालू करण्यासाठी आवश्यक हालचाल अद्याप सुरू झालेली दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत मोठी अस्वस्थता वाढली आहे. आगामी रणनीती ठरविण्यासाठी काकडी (ता. कोपरगाव) येथील सभागृहात नुकतीच कालवा कृती समितीची बैठक जेष्ठ नेते दत्तात्रय चौधरी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, उपाध्यक्ष संजय गुंजाळ,नानासाहेब गाढवे, गंगाधर रहाणे, आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.