अहमदनगर - संगमनेर शहर व तालुक्यात वाढणारी रुग्णसंख्या थांबवण्यासाठी प्रशासनाने अधिक खबरदारी घ्यावी. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक नागरिकाने शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करताना अधिक सतर्कता बाळगावी असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. भाऊसाहेब थोरात कारखाना कार्यस्थळावर कोरोना परिस्थिती व उपाययोजनाबाबत प्रशासकीय अधिकार्यांची आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे ,तहसीलदार अमोल निकम, डॉ. हर्षल तांबे , उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर , ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. संदीप कचोरीया, पोलीस निरीक्षक अभय परमार, सुनील पाटील आदी उपस्थित होते....
बाळासाहेब थोरात यांनी शहरालगत असलेल्या कोरनाबाधित गावामधील प्रमुख नागरिकांची बैठक घेऊन त्यांना अधिक सतर्कतेच्या सूचना दिल्या. कोरोना हे आपल्या सर्वांवरील मोठे संकट आहे, ते रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने अधिक सतर्कता बाळगली पाहिजे. लॉकडाउनच्या शिथीलतेनंतर काही नागरिकांमध्ये हलगर्जीपणा वाढला आहे. त्याचे रूपांतर रुग्णांच्या वाढीमध्ये होत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणून प्रत्येकाने काटेकोरपणे शासनाच्या नियमांचे पालन करावे. प्रशासन कोरोना रोखण्यासाठी काम करत आहे, त्यांना मदत करणे हे नागरिकांचे कर्तव्य असल्याचे थोरात म्हणाले.
आपल्या परिसरात बाहेरून आलेल्या व्यक्तींची कल्पना लगेचच प्रशासनाला द्या, प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, मास्कचा वापर करा, हॅण्ड सॅनिटायझरचा वारंवार वापर करा या सर्व बाबी केल्यास आपण कोरोना वाढ रोखू शकतो. कोरनाची साखळी पुर्णपणे तोडण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे. याचबरोबर ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाबत अधिक जगजागृती होण्याकरता प्रशासनाने सोशल माध्यमांसह गावोगावी सूचना द्याव्यात, असेही थोरात म्हणाले.