अहमदनगर - देशाला स्वातंत्र्य मिळून लवकरच पंच्याहत्तर वर्ष पुर्ण होणार आहेत. स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या काळात विविध क्षेत्रांमध्ये अमूलाग्र प्रगती झाली आहे. मात्र, तरीही काही ठिकाणी आदिवासींची उपासमार अजूनही थांबलेली नसल्याचे पहायला मिळते. अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या आंबीत येथील वाडी-वस्तीतील आदिवासींना स्वस्त धान्य आणण्यासाठी सात ते दहा किलोमीटर अवघड घाट उतरून नदीतून पलीकडे जावे लागते. याबाबत आमदार, जिल्हा पुरवठा अधिकारी, प्रांत, तहसीलदारांना लेखी निवेदने देऊनही कुणी लक्ष देत नाही, असा आरोप या आदिवासी नागरिकांनी केला आहे.
आंबीत आदिवासी कुटुंब सोयी सुविधांपासून अद्याप वंचित आहेत आम्ही कोरोनाने नाही तर उपासमारीने मरू -
अकोले तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात थांबून प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. मात्र, आम्ही कोरोनाने नाही तर उपासमारीने मरू, अशी प्रतिक्रिया आंबितमधील आदिवासींनी दिली. अकोले तालुक्यातील हेंगाडवाडी, दाभाचीवाडी, पायळी या वाडीतील आदिवासींना घाट पार करून स्वस्त धान्य दुकानातून धान्य घ्यावे लागते.
प्रशासनाचे दुर्लक्ष -
मोठे कुटुंब असल्याने पोट भरणे देखील स्वस्त नसल्याचे चित्र आंबित परिसरात दिसत आहे. आंबितच्या दरीतून डोक्यावर ओझे घेऊन वर येताना पूर्ण दमछाक होते. या घाटात तीन महिन्यांपूर्वी दोन महिला पडल्याने त्या सध्या घरात बसून आहेत. कोरोनामुळे खावटी नाही, रोजगार नाही, अशा परिस्थितीत करायचे काय? असा प्रश्न या नागरिकांना पडला आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचयात कार्यालय, तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देऊन स्वस्त धान्याची वाटप वाडी-वस्तीवर करावी, अशी मागणी केली आहे. मात्र, अशी अनेकदा मागणी करूनही प्रशासन व स्थानिक आमदार याकडे लक्ष देत नसल्याचे नागरिक सांगतात.