शिर्डी(अहमदनगर)- लॉकडाऊनमुळे शहरातून आपल्या गावी जाण्याची काही लोकांना परवानगी मिळाली. तर, काही लोकांनी परवानगी न घेताच गावाकडे परतले आहेत. अशात रेड झोनमधून आलेल्यांना लहानपणी गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकवले तिथेच क्वारंटाईन व्हायची वेळ आली आहे. अशावेळी पुस्तके वाचत शाळेची साफसफाई आणि शाळेतील झाडांना पाणी घालत हे लोक आपला वेळ घालवत आहेत.
शहरातून गावातल्या आपल्या घरी जाऊन मस्त राहू, असा विचार करून गावाकडे परतलेल्या अनेकांना आता घरजवळ असूनही नियमामुळे कधीकाळी ज्या शाळेत जायला रडायचो तिथेच आता क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या धास्तीने अनेकजण हादरून गेले आहेत. परगावाहून गावी आल्यानंतर गावातील शाळेत क्वारंटाईन व्हायचे म्हटले तर अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोयी-सुविधांचा अभाव आहे. मग झोपायचे कसे, राहायचे कसे, दिवसरात्र कटणार नाही, बोर होईल असे एकनाही अनेक प्रश्न अनेकांसमोर उभे राहतात. सुविधांच्या अभावामुळे अनेकजण क्वारंटाईन केलेल्या शाळांमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत.