अहमदनगर : हुबेहुब एखाद्या पक्ष्याप्रमाणे दिसणारा आणि तसेच उडणारा अनोखा ड्रोन अहमदनगरमधील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा अनोखा ऑर्निथॉप्टर ड्रोन हवेत अडीच किलोमीटर उंचीपर्यंत तसेच अडीच वर्ग किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रात उड्डाण करण्यास सक्षम आहे. सैन्याला टेहळणी तसेच निगराणीसह शेतपिकांची पाहणी आणि पक्ष्यांपासून संरक्षणासाठी या ड्रोनचा उपयोग केला जाऊ शकतो असे हा ड्रोन तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
अहमदनगरच्या विद्यार्थ्यांनी बनविला पक्ष्याप्रमाणे उडणारा ड्रोन! शेतकऱ्यांना पाच हजारांत उपलब्ध करून देणार! असा आहे ऑर्निथॉप्टर ड्रोन
सीआरएफसी कार्बन फायबर रिइन्फोर्स्ड ऑप्टीमिस्टिकचा वापर करून या ड्रोनचा सांगाडा तयार करण्यात आला आहे. तर साधे प्लास्टीक कागदाचे पंख त्याला लावले आहेत. ड्रोनच्या पंखांची हालचाल नियंत्रित करण्यासाठी गिअर बॉक्स आणि दोन ऑर्डिनो कंट्रोलर्स वापरले आहेत. गती तसेच दिशा नियंत्रणासाठी ऑक्सिलोमीटर आणि गायरोसेन्सर बसविले आहेत. एकदा ड्रोन हवेत गेल्यावर त्याला ऑटो फ्लाईट मोडवरही नियंत्रित करणे शक्य आहे. ड्रोनमध्ये हायलेन्स कॅमेरा वापरून संगणक प्रणालीच्या सहाय्याने रिसिव्हर तसेच ट्रान्समिटरच्या सहाय्याने व्हिडीओ आणि फोटो घेऊन ते मोबाईलवर जतन केले जातात.
कमी वजन; कमी ऊर्जेचा वापर
याचे वजन केवळ 500 ग्रॅम इतके आहे. कमी वजन असल्याने अतिशय कमी ऊर्जेचा वापर या ड्रोनच्या उड्डाणासाठी केला जातो. हे या ड्रोनचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. सध्या दोन साध्या बॅटरींचा वापर यात करण्यात आला असून एकदा चार्ज झाल्यावर तो दीड तास हवेत उड्डाण करू शकतो. विशेष म्हणजे हवेत झेप घेण्यासाठी या ड्रोनला रनवेची गरज नाही.
ड्रोन स्थिरीकरणावर काम सुरू
भविष्यात बॅरोमीटरचा वापर करून आकाशात ठराविक उंचीवर ड्रोन स्थिर ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. दोन पंख, शेपटी, पोटाचा आकार यामुळे हा ड्रोन हुबेहुब पक्ष्यासारखा दिसतो. पक्ष्यांप्रमाणेच पंख हलवून तो उडत असल्याने टेहळणीसारख्या कामात तो सहजतेने वापरला जाऊ शकतो.
अत्यंत कमी खर्चात तयार केला ड्रोन
महाविद्यालयातील विश्वजीत कडलग, आशिष काळे, वैभव नेहे, प्रतिक भालरे या विद्यार्थ्यांनी हा ड्रोन तयार केला आहे. हा ड्रोन तयार करण्यासाठी सुमारे साडेसहा हजार रुपये इतका खर्च आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाणे, प्रा. राजेंद्र खर्डे, विभाग प्रमुख प्रा. संजय बेलकर, प्रा. अजय दिघे यांचे मार्गदर्शन या प्रकल्पासाठी लाभल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना पाच हजारांत ड्रोन उपलब्ध करून देणार!
शेतपिकांची राखण करणे आणि टेहळणीसाठी शेतकऱ्यांना हा ड्रोन फायदेशीर ठरू शकतो. या उद्देशाने शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपयांमध्ये हा ड्रोन उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे या प्रकल्पातील विद्यार्था विश्वजीत कडलग याने सांगितले.
"उरी" चित्रपटातून मिळाली प्रेरणा
"उरी-द सर्जिकल स्ट्राईक" या चित्रपटात दाखविलेला पक्ष्यासारखा ड्रोन पाहून तसाच ड्रोन तयार करण्याची कल्पना सुचल्याचे या विद्यार्थांनी सांगितले. अंतिम वर्षाच्या प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थ्यांनी हा ऑर्निथॉप्टर ड्रोन तयार केला आहे. या ड्रोनचा उपयोग शेतीची निगराणी करणे, बाजरी, मका अशा पिकांचे पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी केला जाऊ शकतो असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा -जळगावातील विद्यार्थ्याने विकसित केला शेतीची कामे करणारा रोबोट!